Aurangabad: गंगापूर साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, प्रशांत बंब यांची प्रतिष्ठा पणाला
Gangapur Sugar Factory Election : औरंगाबादमधील गंगापूर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत भाजपचे आमदार प्रशांत बंब यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
Gangapur Sugar Factory Election: औरंगाबादच्या (Aurangabad) गंगापूर सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी रविवारी (12 फेब्रुवारी) मतदान प्रक्रिया पार पडली असून, आज (13 फेब्रुवारी) मतमोजणी सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत एकूण 54 टक्के मतदान झाले. एकूण 14 हजार 66 मतदार सभासदांपैकी 7 हजार 598 जणांनी मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली. तर एकूण 21 संचालकांपैकी एक जागा बिनविरोध झाल्याने 20 जागांसाठी 40 उमेदवार रिंगणात होते. यासाठी आज मतमोजणी होणार असून, काही वेळेपूर्वी मतमोजणीला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपचे आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
मागील पंधरा वर्षांपासून बंद असलेल्या गंगापूर सह. साखर कारखाना संचालक मंडळाच्या निवडीसाठी तालुक्यातील 40 मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. भाजपचे प्रशांत बंब यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी सभासद कामगार पॅनेल आणि या कारखान्याचे माजी अध्यक्ष शिवसेनेचे (ठाकरे गट) कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या मार्गदर्शनाखालील शिवशाही शेतकरी विकास पॅनेलमध्ये सरळ लढत होत आहे. दरम्यान रविवारी मतदानाच्या दिवशी दोन्ही पॅनेल प्रमुख आणि नेत्यांनी विविध केंद्रांना भेटी देऊन मतदानाचा आढावा घेतला. गंगापूर, वाळूज, लासूर, शेंदूरवादा, कायगाव, जिकठाण, सावखेडा, मांजरी, तुर्काबाद, अंबेलोहळ, अंबेगाव आदी मतदान केंद्रांवर मतदान झाले. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.
पैसे वाटताना एकाला पकडले
एकीकडे गंगापूर तालुक्यात साखर कारखाना निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना, याच निवडणुकीत मतदानाच्या दिवशी लासुर स्टेशन येथील छत्रपती शिवाजी कृषितंत्र विद्यालयाचे लिपीक मिठु विठ्ठलराव रोकडे (वय 51 वर्षे) यांना मतदारांना पैसे वाटप करताना पकडण्यात आले आहे. मतदारांच्या नावांच्या यादीसह 24 रुपये त्यांच्याकडे सापडले. या प्रकरणी गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक शकील शेख यांच्या तक्रारीवरुन रोकडे यांच्या विरुद्ध भादंवि कलम 171 बी व 171 ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा बंदोबस्त...
कारखाना बंद असला तरी तो ताब्यात घेण्यासाठी दोन्ही पॅनेलच्या वतीने प्रतिष्ठा पणाला लावली असून, कारखाना आपण कोणत्याही परिस्थितीत चालू करणार असल्याचा दावा दोन्ही गटाच्या वतीने प्रचारादरम्यान करण्यात आला आहे. दरम्यान मुक्तानंद महाविद्यालयाच्या क्रीडा सभागृहात मतमोजणीला सुरुवात झाली असून, या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: