बच्चू कडूंचं ‘रेल रोको' आंदोलन’ रद्द, हायकोर्टात दिली माहिती; शेतकरी कर्जमाफीवर मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा
उच्च न्यायालयात बच्चू कडू यांचे वकील हरिओम ढगे यांच्याकडून युक्तीवाद करत न्यायालयाला रेल रोको आंदोलन रद्द करण्यात आल्याचे कळवले.

मुंबई : गेल्या महिनाभरापासून शेतकरी कर्जमाफीच्या (Farmer) मुद्द्यावरून रान पेटवलेल्या प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी आपलं आंदोलन अधिक तीव्र केलं आहे. नागपूर येथे शेतकरी, प्रहारच्या कार्यकर्त्यांसह बच्चू कडू (Bachhu kadu) पोहोचले आहेत. त्यातच, उद्या नागपुरात रेल रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलं होतं. मात्र, एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासमवेत बच्चू कडूंची चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे ‘रेल रोको आंदोलन’ रद्द करण्याचा निर्णय कडू यांच्याकडून घेण्यात आला आहे.
उच्च न्यायालयात बच्चू कडू यांचे वकील हरिओम ढगे यांच्याकडून युक्तीवाद करत न्यायालयाला रेल रोको आंदोलन रद्द करण्यात आल्याचे कळवले. न्यायालयाकडून सुमोटो दाखल झालेल्या जनहित याचिकेसंदर्भात आज देखील सुनावणी होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून देखील बच्चू कडूंच्या वकिलांनी घेतलेल्या भूमिकेचे आदेश देताना स्वागत करण्यात आले.
बच्चू कडू यांनी काल चर्चेचा निकाल न लागल्यास ‘रेल रोको’ आंदोलन पुकारण्याचे आवाहन केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. याप्रकरणी, आज सुनावणी पार पडताना पोलिसांकडून न्यायालयात हलफनाम्यात नमूद केलंय की, राष्ट्रीय महामार्ग आणि इतर बंद रस्त्यांवरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. मात्र, बच्चू कडू यांच्याकडून निकाल न लागल्यास पुन्हा 'रेल रोको'चे आवाहन केले असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. त्यावेळी, उद्याचे आंदोलन रद्द करत असल्याचे बच्चू कडू यांच्याकडून सांगण्यात आले.
बच्चू कडू चर्चेसाठी मुंबईला रवाना
दरम्यान, उद्या पुन्हा ह्या शेतकरी आंदोलनाच्या जनहित याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे. तत्पूर्वी, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बच्चू कडू आणि शिष्टमंडळाची चर्चा सुरू आहे. या चर्चेत नेमकं काय तोडगा निघतो ते पाहावे लागेल. बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्य सरकारशी चर्चा करण्याची तयारी दाखवली असून ते काहीवेळापूर्वीच शिष्टमंडळासह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. गुरुवारी संध्याकाळी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 30 अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत शेतकऱ्यांचा (Farmers) सातबारा कोरा करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी नागपूर विमानतळावरुन निघताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.



















