'आप' स्वबळावर महानगरपालिका निवडणूका लढणार; केजरीवालांचे मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूरवर लक्ष
Aam Aadmi Party: आप राज्यातील आगामी सर्व निवडणूका लढणार असल्याची माहिती आपचे राज्य उपाध्यक्ष तथा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Aam Aadmi Party: आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका (Upcoming Municipal Elections) पाहता राज्यातील सर्वच महत्वाचे राजकीय पक्ष कामाला लागले आहे. दरम्यान यासाठी आम आदमी पक्षाकडून ( Aam Aadmi Party) या निवडणुकीसाठी तयारी करण्यात येत असून, आप राज्यातील आगामी सर्व निवडणूका लढणार असल्याची माहिती आपचे राज्य उपाध्यक्ष तथा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर निवडणुकीच्या अनुषंगाने लवकरच राज्यभर रथयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती देखील राठोड यांनी दिली आहे.
औरंगाबाद येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना हरिभाऊ राठोड म्हणाले की, आम आदमी पार्टी ही लोकांच्या मनातील पार्टी झाली आहे. पंजाबमध्ये सत्ता मिळवल्यानंतर गुजरातमध्ये पाच जागा जिंकल्या असून 87 उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. पार्टीने 44 लाख मते घेऊन राष्ट्रीय पार्टीचा दर्जा मिळविला. आता विविध पक्षातून पार्टीत येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आगामी काळात महापालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, विधानसभा, लोकसभा अशा सर्वच निवडणूका पक्ष स्वबळावर लढणार आहे. अन्य पक्ष भ्रष्टाचारी असल्याने कुठल्याही पक्षाशी युती करणार नसल्याची भूमिका देखील राठोड यांनी स्पष्ट केली.
स्वतः अरविंद केजरीवाल येणार
औरंगाबाद शहरात आम आदमी पार्टी महापालिका निवडणूका स्वबळावर लढवणार आहे. 76 उमेदवार निश्चित केलेले आहेत. उर्वरित उमेदवारांसाठी आठ दिवसात मुलाखती घेतल्या जाणार आहेत. वॉर्डावार्डात सदस्य नोंदणी सुरु केलेली आहे. आगामी काळात महाराष्ट्रात मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या शहरांवर अधिक लक्ष आहे. या शहरांमध्ये स्वतः अरविंद केजरीवाल येणार असल्याचे हरिभाऊ राठोड यांनी सांगितले.
इतर पक्षांबाबत दिली प्रतिक्रिया!
पुढे बोलतांना राठोड म्हणाले की, काँग्रेस चांगला पक्ष आहे, काँग्रेसचे ध्येयधोरणेही चांगले आहेत, मात्र पक्षात तेच ते लोक पुढे येत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळेच पक्षाला वाईट दिवस आल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपने सर्व यंत्रणा ताब्यात घेऊन राजकारण सुरु केले आहे. संविधानाची मोडतोड करण्याचे काम सुरु आहे. एकनाथ शिंदेंच्या सरकारबद्दल आठ दिवसात निर्णय अपेक्षीत असताना तारीख पे तारीख सुरु आहे. न्यायालय आणि निवडणूक आयोग एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी नाही, खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांची असल्याचे राठोड यांनी सांगितले.