राष्ट्रवादीला सोबत घेताना विश्वासात घेतलं नाही, अतिरेकानंतर स्फोट होईल, बच्चू कडूंची खदखद बाहेर
NCP Political Crisis : सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत आल्याने शिंदे गटातील आमदारांची अडचण झाली आहे, अतिरेकानंतर स्फोट होईल, अशी खदखद माजी मंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केली.
Maharashtra NCP Political Crisis : राष्ट्रवादीला सरकारमध्ये घेताना विश्वासात घेतलं नाही. सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत आल्याने शिंदे गटातील आमदारांची अडचण झाली आहे, अतिरेकानंतर स्फोट होईल, अशी खदखद माजी मंत्री बच्चू कडू यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली.
अजित पवार यांनी जवळपास 40 आमदारांना सोबत घेत राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड केले. अजित पवार यांच्या बंडामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. शरद पवार आणि अजित पवार असे राष्ट्रवादीमध्ये दोन गट तयार झाले आहे. अजित पवार यांनी 40 आमदारांना हाताशी धरत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर इतर आठ आमदारांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधीनंतर एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेते नाराज असल्याच्या बातम्या आल्या होत्या. आता आमदार बच्चू कडू यांनी याबाबत स्पष्टच व्यक्तव्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सरकारमध्ये घेताना विश्वासात घेतले नाही, अशी खदखद बच्चू कडू यांनी बोलून दाखवली.
राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत घेताना त्यांचं मंथन आणि चिंतन व्हायला पाहिजे होतं. आम्हाला विचारात आणि विश्वासात न घेता राष्ट्रवादीला सोबत घेतलं आहे, असा दावा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणारे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सरकारमध्ये सोबत घेतल्याने आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या सर्व आमदारांची अडचण झाली आहे. कारण मविआ सरकारमध्ये राष्ट्रवादीचा त्रास होता, काम होत नव्हते. शिवसेनेचे मतदार संघ फोडून त्यांच्या मतदारसंघाची बांधणी होत होती, असा आरोप होता. मात्र त्या आरोपाला आता छेद लावण्याचा प्रयत्न आहे. तर ज्यांनी हा उठाव केला त्यांनीच आपल्या डोक्यावर ही कुऱ्हाड मारून घेऊ नये. त्यांचं आयुष्य पणाला लावता कामा नये. सत्तेसाठी काही पण असं होऊ नये, याची आम्हाला अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस मधील बंडावर आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिली. शरद पवारांनी पक्ष उभारण्यासाठी जी मेहनत घेतली, त्यामुळे या बंडाचं दुःख मोठ आहे. शरद पवार साहेबांना झालेल्या वेदना कमी नाहीत. त्यांचं सांत्वन आम्ही करतो. या उठावाची सुरुवात उद्धव ठाकरेंनी केली. त्यानंतर शिंदे आणि आता अजित पवार यांनी केली आहे. सगळ्या उठावाचे भिष्मपिता शरद पवार आहेत. बंड शरद पवारसाठी नवीन नाही. बदलत्या राजकारणात अजित पवार यांनी उचलेल पाऊल अभिनंदनास पात्र आहे, असे बच्चू कडू म्हणाले