Maharashtra Breaking News 30 June 2022 : राज्यातील घडामोडीची प्रत्येक अपडेट फक्त एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
आजपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात, यात्रेच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त
आजपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे दोन वर्ष रद्द झाल्यानंतर यंदाच्या वर्षी होत असलेल्या बाबा बर्फानी (Baba Barfani) यांच्या यात्रेला यात्रेकरूंचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळत आहे. पहलगाम बेस कँमवर सुमारे 10 हजार यात्रेकरु पोहोचले आहेत. यंदाची अमरनाथ यात्रा 43 दिवस चालणार आहे. आजपासून सुरु झालेल्या यात्रेची सांगता 11 ऑगस्ट रोजी होणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अलिकडे तणावाचं वातावरण आहे, यामुळे जम्मू-काश्मीर प्रशासन तसेच पोलीस प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलताना दिसत आहे. पोलिसांकडून सुरक्षेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. शिवाय परिसरात अतिरिक्त जवानही तैनात करण्यात आले आहेत.
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलांना मोठे यश
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले असून, कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगाममधील अमरनाथ यात्रेच्या मार्गाच्या अगदी जवळ ही चकमक झाली. यावेळी सुरक्षा दलांना हे यश मिळाले. चकमकीत ठार झालेल्या दोन्ही दहशतवाद्यांची ओळख लष्कर-ए-तैयबाचे (LET) दहशतवादी अशी झाली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी मारलेल्या दहशतवाद्यांची लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी म्हणून ओळख पटली आहे.
आसाममध्ये पुरामुळं शेतीचं मोठं नुकसान
संततधार मुसळधार पावसामुळं आसाममध्ये पूर आला आहे. पुरामुळं तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्यातील 40 लाखाहून अधिक लोक या पुरामुळं बाधित झाले आहेत. तर पूर आणि भूस्खलनामुळं आत्तापर्यंत 134 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या भीषण पुराच्या पार्श्वभूमीवर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली. कालदिया नदीला आलेल्या पुरामुळे सध्याची परिस्थिती आणि नुकसानीची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बजली जिल्ह्याचा दौरा केला. मुख्यमंत्र्यांनी भबानीपूर, बजली येथील चारलपारा नयापारा येथील पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला. आसाममधील 74 हजार 655 हेक्टरवरील पीक क्षेत्र अजूनही पाण्याखाली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आणि महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. तर दुसरीकडे पुढच्या एक ते दोन दिवसात फडणवीसांच्या शपथविधीची शक्यता आहे. आज भाजप सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. भाजपच्या गोटात जल्लोष सुरु आहे. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीसांना पेढे भरवून भाजपनं जल्लोष केला. बहुमत चाचणीसंदर्भात सुप्रीम कोर्टानं मविआला धक्का दिला आणि बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. विरोधात निकाल गेल्यानं उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्ह घेत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचं जनतेला सांगितलं.
आज भाजप सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता
महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती. आज या सत्तासंघर्षाचा दहावा दिवस. विधान परिषद (Vidhan Parishad) निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंचं नाराजीनाट्य सुरु झालं. आधी समर्थक आमदारांसह शिंदे 21 तारखेला सुरतला पोहोचले. एकनाथ शिंदे आणि आमदारांनी सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला. शिवसेनेकडून शिंदेंची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं एकनाथ शिंदेंच्या वतींनं सांगण्यात आलं. भावनिक साद, आवाहन, अल्टिमेटम सर्व काही करुन झालं पण बंडखोर आमदार आपल्या भूमिकेवर ठाम होते. अखेर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग केला आणि गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्रात सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं.
Aurangabad: संजय शिरसाट,अब्दुल सत्तार यांच्या समर्थकांकडून जल्लोष
Maharashtra New Govt: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांनतर शिंदे गटात आणि भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात. दरम्यान शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांच्या कार्यालयाबाहेर त्यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष साजरा केला. यावेळी आतिषबाजी करत मिठाई वाटप करण्यात आली.
Aurangabad: आज सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा 42 रुग्णांची वाढ
Aurangabad Corona Update: औरंगाबाद जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशी नवीन 42 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. ज्यात ग्रामीण भागातील 14 रुग्ण तर 28 रुग्ण शहरातील आहे. तर 18 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. ज्यात 5 रुग्ण ग्रामीण भागातील असून,13 रुग्ण शहरातील आहे. तर 171 रुग्ण सक्रिय आहे. ज्यातील 153 रुग्णांना कोणतेही गंभीर लक्षणे नसल्याने ते घरीच उपचार घेत आहे.
मध्य रेल्वेवरील लोकल वाहतूक सुरळीत : मध्य रेल्वे
सकाळपासूनच मुंबईत तुफान पाऊस सुरु आहे. सीएसएमटी, दादर, भायखळा, कुर्ला या ठिकाणी जोरदार मध्ये पाऊस सुरू आहे. तरी सर्व लोकल योग्यपणे सुरु आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेचे पीओरओ यांनी दिली आहे.
पावसाने जोर पकडला आहे. सीएसएमटी, दादर, भायखळा, कुर्ला या सेक्शन मध्ये पाऊस सुरू आहे. ट्रेन्स सुरू आहेत. माहितीस्तव.
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) June 30, 2022
It's raining heavily in CSMT, Dadar, Byculla, Kurla section. Trains are running. For information.#mumbairain @drmmumbaicr
पुणे : न्यायालय परिसरात थुंकणं पडलं महागात; अख्खा मजला पुसून काढावा लागला
जुन्नरच्या न्यायालयाच्या इमारतीत थुंकणाऱ्या तरुणाला संपूर्ण मजला साफ पुसण्याची शिक्षा करण्यात आली. न्यायमूर्ती अभय ओक यांनी न्यायालयाचे पावित्र्य राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, अशी भावना व्यक्त केली. जुन्नर येथे न्यायालयाच्या नव्याने विस्तारित इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यासंदर्भात जुन्नर न्यायालयाची नवीन बांधण्यात आलेली इमारत स्वच्छ ठेवावी, तसेच जे अस्वच्छ आहेत व पायाभूत सुविधांची स्वच्छता ठेवत नाहीत त्यांच्यावर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्यात येत आहे. नव्याने बांधण्यात आलेली जुन्नर न्यायालयाची इमारत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आकर्षण ठरली आहे. या इमारतीत दर्जेदार बांधकाम, न्यायालयीन प्रशासन, अधिकारी, कर्मचारी, वकील, पक्षकार, नागरिकांसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा आहेत.
मुंबईतील कुर्ला इमारत दुर्घटनेवर CM योगींकडून शोक व्यक्त
बईतील कुर्ला येथे दोन दिवसांपूर्वी नाईकनगर परिसरातील चार मजली इमारत दुर्घटनेमध्ये एकूण 19 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे,. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून यापूर्वी 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर एकनाथ शिंदे गटाकडूनही 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, इमारत दुर्घटनेत मृत पावलेल्यांपैकी काही यूपी-बिहारमधीलही होते. त्यामुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमींबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्याचबरोबर मृत आणि जखमींसाठी आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.