Pune Crime News: याला म्हणतात खरी शिक्षा! न्यायालय परिसरात थुंकणं पडलं महागात; अख्खा मजला पुसून काढावा लागला
जुन्नरच्या न्यायालयाच्या इमारतीत थुंकणाऱ्या तरुणाला संपूर्ण मजला साफ पुसण्याची शिक्षा करण्यात आली.
Pune Crime News: जुन्नरच्या न्यायालयाच्या इमारतीत थुंकणाऱ्या तरुणाला संपूर्ण मजला साफ पुसण्याची शिक्षा करण्यात आली. न्यायमूर्ती अभय ओक यांनी न्यायालयाचे पावित्र्य राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, अशी भावना व्यक्त केली. जुन्नर येथे न्यायालयाच्या नव्याने विस्तारित इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यासंदर्भात जुन्नर न्यायालयाची नवीन बांधण्यात आलेली इमारत स्वच्छ ठेवावी, तसेच जे अस्वच्छ आहेत व पायाभूत सुविधांची स्वच्छता ठेवत नाहीत त्यांच्यावर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्यात येत आहे. नव्याने बांधण्यात आलेली जुन्नर न्यायालयाची इमारत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आकर्षण ठरली आहे. या इमारतीत दर्जेदार बांधकाम, न्यायालयीन प्रशासन, अधिकारी, कर्मचारी, वकील, पक्षकार, नागरिकांसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा आहेत.
सरकारी कार्यालयांमध्ये अस्वच्छता असते. मात्र, नागरिकांच्या सहकार्याची गरज असलेल्या नवीन इमारतीत हे चित्र तयार होऊ नये, यासाठी न्यायालय प्रशासन दक्ष आहे. पण अनेकदा अशी मानसिकता असते की घर नेहमी स्वच्छ असले पाहिजे पण सार्वजनिक ठिकाणे ही कुणाची जबाबदारी नाही. याच मानसिकतेला जुन्नरच्या न्यायमुर्तींनी विरोध करत त्यावर जालीम उपाय शोधला आहे. ग्रामीण परिसरातील नागरिकांना अनेक व्यसनं असतात. तिच व्यसनं करुन ते न्यायालयात कामकाजासाठी येतात. सरकारी कार्यालयांच्या कोपऱ्यात थुकणाऱ्यांची संख्या काही कमी नाही त्यामुळे या व्यसनी लोकांना चोप बसवण्यासाठी जो जे करेल त्याला ते साफ करण्याची शिक्षा देण्याच जुन्नर न्यायमुर्तींचा मानस दिसत आहे.
नवीन इमारतीच्या प्रवेशद्वारावर नागरिकांना बाहेरील पेटीतील तंबाखू, गुटखा व तत्सम पदार्थ काढूनच आतमध्ये प्रवेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बेशिस्त व्यक्ती आढळून आल्यास पोलिसांकडून घटनास्थळी कारवाई केली जात असून आर्थिक दंडही वसूल केला जात आहे. प्रवेशद्वार बंद करून आतमधील सर्व कर्मचारी व नागरिकांनी स्वयंशिस्तीत राहावे यासाठी काळजी घ्यावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. देशात स्वच्छतेबाबत अनेकदा जनजागृती केली. मात्र नागरिकांच्या सवयी सुधारल्या नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे या सगळ्यांना दंडात्म शिक्षेऐवजी वेगळी शिक्षा दिली तर यांना चोप मिळेल, असंही नागरिकांचं मत आहे.