Maharashtra Breaking News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी.. पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...
आज पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन
पाच दिवसांच्या गणेशाचं आज विसर्जन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून विसर्जनाची जय्यत तयारी करण्यात आली असून मुंबईतील समुद्र किनारे आणि तलावांच्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना पूर्ण झाल्या आहेत. मुंबईतील प्रमुख विसर्जन स्थळी 211 स्वागत कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. तसेच यासाठी तब्बल 10 हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने काही ठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे.
आरे कारशेडप्रकरणी पर्यावरणवाद्यांचं आंदोलन
आरे कारशेड प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली गेली असली तरी पर्यावरणप्रेमींकडून आंदोलन सुरुच राहणार आहे. आज सकाळी 11 वाजता आरेतील पिकनिक स्पॉट परिसरात पर्यावरणप्रेमी एकत्रित येत आंदोलन करणार आहेत.
महागाईविरोधात काँग्रेसचं आज आंदोलन
वाढती महागाई, बेरोजगारी आणि जीएसटीवरून भाजप सरकारला घेरण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. आज सकाळी 11 वाजता दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेसकडून भव्य रॅली काढण्यात येणार आहे. 'महागाई पर हल्ला बोल' असे या रॅलीचे नाव असेल. काँग्रेसच्या कमिटीच्या मुख्यालयातून काँग्रेस नेते राहुल गांधी बसने दिल्लीतील रामलीला मैदावावर येऊ शकतात. त्यांच्यासोबत काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते असणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईत येणार
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईत येणार आहेत. आज रात्री 9.30 वाजता अमित शाह मुंबईत दाखल होतील. त्यानंतर ते रात्री सह्याद्री गेस्ट हाऊसला मुक्कामी राहतील. त्यांच्या मुंबई दौऱ्यासाठी मुंबई पोलीस सतर्क आहेत.
ठाण्यात रेल्वे प्रवाशांचे आंदोलन
ठाण्याच्या पुढच्या प्रवासासाठी रेल्वे प्रवाशांचा लढा सुरूच राहणार असून आज दुपारी 12 वाजता मुंब्रा स्थानकात सर्व प्रवासी जमणार आहेत. कळवा-मुंब्रा इथे थांबणाऱ्या 21 लोकल बंद करण्यात आल्याने प्रवासी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. मध्य रेल्वे विरोधात, एसी लोकल विरोधात सातत्याने ट्वीट करून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड विरोध दर्शवत आहेत.
भारत-पाकिस्तान पुन्हा आमने सामने
भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमने सामने येणार असून आज संध्याकाळी 7.30 वाजता सामना आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा आशिया चषकातील सुपर 4 मधील सामना खेळवला जाईल. याआधी 28 ऑगस्ट रोजी भारताने ग्रुप स्टेजच्या सामन्यात पाकिस्तानला 5 विकेट्सनी मात दिली होती. यावेळी आधी फलंदाजी करत पाकिस्तानने 147 धावा केल्या होत्या. भारताने 19.4 षटकात 5 गडी गमावत 148 धावांचे लक्ष गाठले. यावेळी जाडेजा आणि पांड्या यांनी कमाल कामगिरी केली होती. ज्यानंतर आता सुपर 4 च्या सामन्यात दोन्ही संघ पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत.
Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल झाले आहेत. अमित शाह उद्या भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक घेणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांची भेट महत्त्वाची आहे.
देशांचे गृहमंत्री अमित शाह काही तासांत मुंबईला पोहोचणार
देशांचे गृहमंत्री अमित शाह काही तासांत मुंबईला पोहोचणार आहेत. सुरक्षेचे उपाय पाहता मुंबई पोलीस सतर्क झाले असून मुंबईत ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. शाह हे रात्रभर सह्याद्री गेस्ट हाऊसवर राहणार आहेत. त्यामुळे गेस्ट हाऊसबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सद्यस्थिती तपासण्यासाठी या भागात दौरा केला असून पोलिसांकडून नियमित फेऱ्या मारल्या जात आहेत. मुंबईतील शाह यांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सर्व उपाययोजना व काळजी घेत आहेत.
बेस्ट उपक्रमाच्या गणेश दर्शनाकरिता चालविण्यात येणाऱ्या विशेष बस सेवेला प्रवाशांकडून उदंड प्रतिसाद
गणेशोत्सवादरम्यान रात्रीच्या वेळेस मुंबईतील विविध भागात असलेल्या सार्वजनिक गणेश मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी गणेश भक्तांची मोठी झुंबड उडते.याचा विचार करून यंदा संपूर्ण रात्रभर गणेश भक्तांच्या प्रवासाची सोय बेस्ट उपक्रमांकडून करण्यात आलेली आहे. सदर विशेष बस सेवेअंतर्गत खुल्या दुमजली बस गाड्या, हो हो बस योजनेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या बसगाड्या तसेच संपूर्ण रात्रभर विविध बस मार्गावर चालवण्यात येणाऱ्या विशेष बस गाड्यांचा समावेश आहे. गणेशोत्सवा दरम्यान राबविण्यात आलेल्या बेस्ट उपक्रमाच्या या विशेष बस सेवेला प्रवाशांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे आढळून आले आहे. या सेवेअंतर्गत हो हो आणि खुल्या दुमजली बस गाड्यांमधून कालच्या रात्रभरात 500 प्रवाशांनी लाभ घेतला असून विविध बस मार्गांवर चालणाऱ्या बस गाड्यांमधून एकंदर 4000 प्रवाशांनी लाभ घेतला असल्याचे दिसून येते. बेस्ट उपक्रमाने राबविलेल्या या विशेष बस सेवा मोहिमेला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल बेस्ट उपक्रम मुंबईकर जनतेचा आभारी आहे.
या बस सेवेला उर्वरित दिवसात देखील असाच भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमांकडून करण्यात येत आहे.
Aurangabad : वीज पडून शेतकऱ्याच मृत्यू
गेल्या तीन चार तासापासून औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटासह धुवाधार पाऊस पाहायला मिळत आहे. दरम्यान वैजापूर तालुक्यातील चांदेगाव येथे गट नंबर 38 मध्ये शेत वस्तीवर राहत असलेले दिपाली राहुल बोधक (वय 31 वर्षे) यांचा शेतातून घरी येत असताना वीज पडून मृत्यू झाला आहे. तरी पुढील कारवाईसाठी मृतदेह वैजापूर सरकारी हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले आहे. संध्याकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली आहे.
Aurangabad Rain: औरंगाबाद जिल्ह्यात पाणीच पाणी, बळीराजा पुन्हा एकदा संकटात
गेल्या दोन तासांपासून औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसाची धुवाधार बॅटिंग पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील गंगापूर, पैठण, सिल्लोड, सोयगाव तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विजांच्या कडकडाटासह, वादळी वाराही पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पुन्हा एकदा चिंता वाढली असून,पिकांचे मोठं नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी शेतात गुडघ्या इतकं पाणी तुंबला आहे. तर बहुतांश ठिकाणी पीक आडवी झाली आहे. कापूस, मका, सोयाबीन, बाजरी या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे तोंडघशी आलेला घास पुन्हा एकदा पावसाने हिसकावून नेला आहे.