गडचिरोलीतील खनिजांवर सरकारचा डोळा; वांडोली चकमकीवरून नक्षलवाद्यांची पत्रकातून आगपाखड
Gadchiroli Naxal : राज्यात सत्तेवर असलेल्या सरकारचा गडचिरोलीतील मौल्यवान खनिजांवर डोळा आहे. असा आरोप करीत नक्षलवाद्यांनी राज्य सरकारवर आगपाखड केली आहे.
Gadchiroli News गडचिरोली : राज्यात सत्तेवर असलेल्या सरकारचा गडचिरोलीतील मौल्यवान खनिजांवर डोळा आहे. हे खनिज देशातील उद्योगपतींना कवडीमोल दरात देण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. म्हणूनच उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) जिल्ह्यात लोह प्रकल्पाच्या भूमिपूजनाकरिता आलेले असताना चकमक घडविण्यात आली, असा आरोप करीत नक्षलवाद्यांनी राज्य सरकारवर आगपाखड केली आहे. वांडोली येथील चकमकीवरून नक्षलवाद्यांनी (Naxal) पत्रक जारी करत ही आगपाखड केली आहे.
वांडोली चकमकीवरून नक्षलवाद्यांची पत्रकातून आगपाखड
गडचिरोलीतील एटापल्ली तालुक्यातील जारावंडी पोलीस हद्दीत येणाऱ्या वांडोली गावानजीक पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये 17 जुलै रोजी मोठी चकमक उडाली होती. यात तीन मोठ्या नेत्यांसह कसनसूर, कोरची, टिपागड, चातगाव दलमलचे 12 नक्षलवादी ठार झाले होते. या चकमकीनंतर उत्तर गडचिरोलीतील नक्षलवादी चळवळ संपुष्टात आल्याचे पोलिसांनी जाहीर केले होते. त्यानंतर तब्बल 23 दिवसांनी नक्षलवाद्यांच्या पश्चिम सब झोनल ब्युरोचा प्रवक्ता श्रीनिवास याने 10 ऑगस्ट रोजी पत्रक जारी केले आहे. यामध्ये चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. सोबतच चकमकीवर प्रश्न उपस्थित करून राज्य सरकारला लक्ष्य केले आहे.
सूरजागड येथील खणीचे महत्त्व काय?
सुरजागड मधील लोह खनिज छत्तीसगड आणि ओडिसाच्या धर्तीवर देशातील सर्वोत्तम लोहखनिजाच्या तोडीस तोड आहे. भारतात लोहपोलादाचा (steel ) सर्वात मोठा बाजार महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकात आहे. त्यामुळे छत्तीसगड आणि ओडिसाच्या खाणींच्या तुलनेत सुरजागडची खाण स्ट्रेटेजिकली अचूक ठिकाणी आहे. परिणामी येणाऱ्या काळात त्याचाच मोठा फायदा महाराष्ट्रातील लोह पोलाद प्रकल्पांना मिळेल. आणि गडचिरोली जिल्हाच नव्हे, तर संपूर्ण विदर्भ स्टील उत्पादनाचा हब बनेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
शहीद सप्ताह निमित्य घातपाताचा डाव सुरूच!
नुकतेच छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या सीमेवर बुधवारी 17 जुलै रोजी गडचिरोली जिल्ह्यातील वांडोली जवळच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक घडली. या पोलीस-नक्षलवादी चकमकीत महाराष्ट्राच्या विशेष दलाच्या C-60 कमांडोंनी 12 नक्षलवाद्यांचा खात्मा केलाय. परिणामी, नक्षलवाद्यांचे टिपागड दलम आणि चातगाव -कसनसूर दलम कायमचे संपुष्टात येऊन उत्तर गडचिरोली सशस्त्र नक्षलवादापासून मुक्त झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
या घटनेला अवघे काही दिवस उलटत नाही तोच पुन्हा माओवाद्यांच्या घातपाताच्या घटना उजेडात आल्या आहेत. पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून माओवाद्यांनी एक इसमास बंदुकीच्या गोळ्या घालून हत्या केली होती. त्या पाठोपाठ आणखी एक तशीच हत्येची घटना उजेडात आली आहे. त्यामुळे या नक्षल्यांच्या घातपातांच्या घटनांचा बीमोड करणे हे पोलिसांच्या पुढील आव्हान असणार आहे.
हे ही वाचा