जखमी बापासाठी खाटेची कावड, चिखलातून वाट काढत मुलाची 18 किलोमीटरची पायपीट; गडचिरोलीच्या भामरागड येथील विदारक चित्र
Gadchiroli News : शेतीकाम करताना घसरुन पडल्याने जखमी झालेल्या पित्याला दवाखान्यात नेण्यासाठी मुलाने मित्रांच्या मदतीने खाटेची कावड करुन चिखलात तब्बल 18 किलोमीटरची पायपीट केलीय.
Gadchiroli News गडचिरोली : शेतीकाम करताना घसरुन पडल्याने जखमी झालेल्या पित्याला दवाखान्यात नेण्यासाठी मुलाने मित्रांच्या मदतीने खाटेची कावड करुन चिखलात तब्बल 18 किलोमीटरची पायपीट केलीय. वाटेत नदी तुडूंब भरलेली होती, अशातच पितृप्रेमही ओसंडून वाहत होते आणि त्याच प्रेमापोटी या सर्व परिस्थितीवर मात करत नावेतून नदी पार केल्यानंतर पुत्राने आपल्या वडीलाला रुग्णालयात भरती केलं. गडचिरोली (Gadchiroli News) जिल्ह्याच्या भामरागड येथे हे विदारक चित्र बघायला मिळाले आहे.
मालू केये मज्जी (वय 67, रा. भटपार ता. भामरागड) असे जखमी पित्याचे नाव आहे. जिल्ह्यात आठ दिवसांपासून अतिवृष्टी सुरु आहे. त्याचा सर्वाधिक फटका भामरागड या नक्षलग्रस्त (Gadchiroli Naxal)आणि अतिदुर्गम गावाला बसलाय. पर्लकोटा नदीवरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने अद्यापही भामरागड शहराचा संपर्क तुटलेलाच आहे. तालुक्यातील घनदाट जंगलातील दुर्गम, अतिदुर्गम गावातील स्थितीही याहून वेगळी नाही.
जखमी बापासाठी चिखलातून वाट काढत मुलाची चक्क 18 किमीची पायपीट
दरम्यान, मालू मज्जी हे 26 जुलै रोजी नित्याप्रमाणे शेतात कामासाठी गेले होते. त्यावेळी चिखलात पाय घसरुन पडल्याने त्यांना दुखापत झाली. त्यामुळे त्यांचे चालणे, फिरणेही कठीण झाले. वेदनेने विव्हळणाऱ्या पित्याला दवाखान्यात नेण्यासाठी भटपारपासून 18 किलोमीटर अंतरावरील भामरागडला जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. वाहन नव्हते, चिखलात पायपीट करणे हाच मार्ग होता. त्यामुळे त्यांचा मुलगा पुसू मालू मज्जी याने मित्रांच्या मदतीने खाटेची कावड केली आणि मालू यांना त्यावर झोपवून भामरागडला निघाला.
चिखल तुडवत पुसू मालू आणि त्याचे तीन ते चार मित्र पामुलगौतम नदीतिरी पोहोचले.नदी तुडूंब भरुन वाहत होती, पण पुसू मालू आणि त्याच्या मित्रांनी हिंमत न हारता नावेत खाट टाकून नदी पार केली. तेथून पुन्हा खाटेवरुनच त्यांना भामरागडच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केली, त्यानंतर एक्सरे काढला. यात त्यांचा पाय फ्रॅक्चर असल्याचे निदान झाले.
दुर्गम भागात नागरिकांचे प्रचंड हाल
या प्रसंगानंतर पुत्रप्रेमाची तर चर्चा झालीच, पण अतिदुर्गम भागात पुरामुळे रुग्णांचे कसे हाल होत आहेत, हे देखील यामुळे चव्हाट्यावर आले. काही दिवसांपूर्वी गरोदर मातेला जीसीबीच्या बकेट मध्ये बसून नाला पार करावा लागला होता. हे एबीपी माझा ने दाखवलं होत तर काही महिन्यांपूर्वी वेळेवर रुग्णवाहीका उपलब्ध न झाल्याने एका चार वर्षीय मुलाला आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झालेली नसून दुर्गम भागातील आदिवासींचे प्रचंड हाल होताना दिसून येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या