ऑनलाइन कोविडची लस बुक करत असाल तर सावधान !महाराष्ट्र सायबर सेलचा इशारा
कोरोनाच्या लसीच वितरण देशात येत्या काही दिवसात होणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर याबाबतीत बनावट लसींचं वितरण करणारे रॅकेट्स सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांची फसवणूक होऊ शकते आणि त्यांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा सायबर सेलने दिला आहे.
मुंबई: गेले वर्षभर कोरोनाच्या साथीनं जगभरात थैमान घातलाय. हजारो लोक या साथीच्या आजाराला बळी पडले आहेत आणि अनेकांनी त्यात आपला जीव गमावलाय. कोव्हिड 19 ची लस येत्या काही आठवड्यांत विकसित केली जाऊ शकते म्हणून सरकारने मोठ्या प्रमाणात लसीकरण कार्यक्रम राबविण्याची तयारी केली आहे. आता सरकारच्या या नियोजित साखळीसमोर बनावट लसीचं मोठं आव्हान असणार असल्याचं दिसतंय. महाराष्ट्र सायबर सेलने तसा सावधानतेचा इशारा दिला आहे.
सरकारच्या कोविड लसीकरणाच्या पुरवठा साखळी अडथळा आणण्याचा प्रयत्न अनेकांकडून करण्यात येण्याची शक्यता आहे. बनावट वेबसाइट्सद्वारे आणि खोट्या इलाजांद्वारे या क्षेत्रातले सराईत गुन्हेगार जनतेला लक्ष्य करण्याची शक्यता आहे. यांमुळे जनतेचे आरोग्य धोक्यात येऊ शकते असे आवाहन महाराष्ट्र सायबर क्राईमचे आयजी यशस्वी यादव यांनी केलं आहे.
बनावट वेबसाइट अशा प्रकारचे गुन्हेगार किंवा फसवणूक करणारे बनावट वेबसाइट तयार करू शकतात ज्याद्वारे आपण स्वतःसाठी ऑनलाइन लस बुक करू शकता असं सांगण्यात येईल किंवा वेबसाइटद्वारे पैसे घेऊन आपल्या घरी लस पोहचवण्याचं आश्वासन ते देऊ शकतात. अशा प्रकारचे व्यवहार केले गेल्यास नागरिकांची फसवणूक होऊ शकते. जर कोणी अशी लस उपलब्ध करुन दिली तरी ती कोरोनाची लस असेल याची शाश्वती नाही.
बनावट लस बाजारात येण्याची शक्यता सध्या कोरोनाच्या लसीसंदर्भात काही बनावट बातम्या व्हॉट्स अॅप आणि फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पसरवण्यात येत आहेत. बनावट तंत्रज्ञानाचा वापर करून सरकारी अधिकारी निवेदन देतानाचे व्हिडिओ तयार केले जाऊ शकतात किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून अधिका-यांच्या आवाजाची कॉपी करुन तशा प्रकारचा बनावट व्हिडिओ पसरवण्यात येऊ शकतो. यामुळे लसीबद्दल लोकांमध्ये चुकीची माहिती प्रसारित होऊ शकते. तसेच लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते किंवा संभ्रम निर्माण होऊ शकतो
अशा प्रकारचे कृत्य करताना कोणी सापडल्यास आयटी कायदा कलम 66 D (फसवणुकीसाठी शिक्षा), तसेच फसवणूक व अपराधीपणाने मालमत्तेची माहिती काढून टाकणे या कलमांतर्गत दोषी असतील.
सायबर सेलचे आवाहन
- कोरोना लसीकरण आणि वितरण या संबंधित बातम्यांसाठी केवळ अधिकृत स्रोतांवर विश्वास ठेवा.
- लसीसंदर्भातील कोणत्याही बातम्यांसाठी सरकारने विकसित केलेल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर विश्वास ठेवा.
- अशा घटना घडत असतील तर त्याची माहिती www.cybercrime.gov.in या वेबसाइटवर द्या किंवा तुमच्या जवळच्या पोलिस स्टेशनला भेट द्या.
- कोरोना लसीसंबंधी कोणत्याही संकेतस्थळावरून किंवा जाहिराती पाहून लस खरेदी करू नका.
- सोशल मीडियावर प्रसारित केलेले कोणतेही संदेश किंवा पोस्ट खात्री न करता फॉरवर्ड करु नका.
महत्वाच्या बातम्या: