हॉटेलच्या एका थाळीवर दोन थाळी फ्री देण्याच्या बहाण्याने ग्राहकांची हजारो रुपयांची लूट
एका थाळीवर दोन थाळी फ्री असल्याची बनावट जाहिरात सोशल मीडियावर करुन त्या माध्यमातून ग्राहकांची हजारो रुपयांची लूट करणारी टोळी कार्यरत झाली आहे.
नाशिक : ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला गंडा घालण्याचा मुद्दा ताजा असतानाच हॉटेलच्या एका थाळीवर दोन थाळी देण्याच्या बहण्याने ग्राहकांची हजारो रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. यामागे मोठी टोळी कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
एका शर्टवर एक शर्ट फ्री.. एक जीन्स वर दोन जीन्स फ्री एवढच काय तर दोन मोबाईलवर एक मोबाईल फ्री अशा असंख्य जाहिराती तुम्ही-आम्ही बघितल्या असतील. मात्र आता नाशिकमध्ये हॉटेलच्या एक थाळीवर दोन थाळी फ्री देण्याच्या जाहिरातीची चर्चा आहे. हॉटेल करीलीव्ह ग्रुपच्या राजभोग थाळीच्या नावाने एका थाळीवर दोन थाळी फ्री असल्याची बनावट जाहिरात सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्या माध्यमातून ग्राहकांची हजारो रुपयांची लूट झाली आहे. यामुळे ग्राहकांना आणि हॉटेल व्यवसायिक दोघांना ही मनस्ताप सहन करावा लागत आहे. केवळ हे एक हॉटेल नाही तर इतरही हॉटेलच्या बाबतीत अशी फसवणूक झाली असावी असा संशय व्यक्त होत असून सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऑनलाइन गंडा घालण्यासाठी पहिले सावज शोधले जाते नंतर त्यांना एका थाळीवर 2 थाळी फ्री मिळणार असे आमिष दाखविले जाते. त्यानंतर थाळी बुकिंगसाठी 10 रुपये ऑनलाइन व्यवयहर करण्यास सांगतात. एकदा ग्राहक ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी तयार झाला की, त्याच्या मोबईलवर आलेला otp नंबर विचारला जातो आणि नंतर ग्राहकाच्या खत्यातून परस्पर पैसे काढले जातात. अनेक ग्राहकांच्या खात्यातून 10 हजार ते 25 हजारपर्यंत रकमा काढत आता पर्यंत लाखों रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. सायबर पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून ग्राहकांनी खोट्या जाहिरातीला बळी पडू नये असे आवाहान पोलिस करत आहेत.
कुठलाही निनावी फोन आला तर त्याच्यावर विश्वास ठेवू नये तसेच कोणी otp नंबर मागितला तर कोणाला ही देऊ नये. फोन पे गुगल पे करण्यासाठी आपल्या खात्याचा otp नंबर देण्याची गरज नाही. एवढे करूनही कोणाला नंबर दिला तर खत्यातून पैसे जात असल्याच निदर्शनास आल्यास त्वरित पोलिसात तक्रार करून बँकेशी संपर्क साधून खाते बंद करावेत असा सल्ला सायबर तज्ज्ञ देत आहेत.
गेल्या काही दिवसात एकमेकाशी संपर्क नको म्हणून ऑनलाइन व्यवहारांना पसंती दिली जात आहे. मात्र हा व्यवहार करताना प्रत्येकाने खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. नाहीतर कधी, विद्यार्थी, कधी पालक कधी व्यवसायीक तर कधी ग्राहक असे फसवणूकीचे सत्र कायम असेच सुरू राहील.