सार्वजनिक समारंभ, शाळा 50 टक्के क्षमतेनं सुरू करण्यास परवानगी द्या; महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Maharashtra Coronavirus Lockdown : सार्वजनिक समारंभ, शाळा 50 टक्के क्षमतेनं सुरू करण्यास परवानगी द्या, अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सनं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
Maharashtra Coronavirus Lockdown : राज्यातील शाळा सुरू करण्याच्या मागणीसाठी आता महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सही मैदानात उतरलं आहे. शाळा, लग्न समारंभांवरील निर्बंधांमध्ये बदल करण्याची मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने केलीय.. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे ही मागणी केली आहे.
महाराष्ट्रात राज्य सरकारनं लागू केलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांमध्ये काही सुधारणा करून लग्न आणि अन्य सार्वजनिक समारंभामध्ये 50 टक्के क्षमतेने उपस्थितीसाठी तसेच शाळा आणि शैक्षणिक संस्था 50 टक्के क्षमतेनं सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीनं अध्यक्ष ललित गांधी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्र चेंबर तर्फे काल (मंगळवारी) माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे मुख्य सचिव, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह संबंधित विभागांच्या सचिवांना चेंबर तर्फे निवेदन देऊन यासंदर्भात तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पाहा व्हिडीओ : शाळा सुरु करण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आता मैदानात
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात भूमिका मांडताना ललित गांधी यांनी काय म्हटलंय?
लग्नसमारंभ, सभा, सामाजिक कार्यक्रम, सेमीनार्स इत्यादींसाठी 50 जणांची मर्यादा निश्चित केली आहे. अशा प्रकारच्या आयोजनांवर इव्हेन्ट ऑर्गनायझर्स, कॅटरर्स, टेन्ट कॉन्ट्रॅक्टर्स, डेकोरेटर्स, बँडवाले इत्यादी अनेक छोट्या छोट्या व्यावसायिकांचा रोजगार आणि उदरनिर्वाह अवलंबून आहे. 50 जणांच्या मर्यादेमुळे हे सर्व व्यावसायिक अडचणीत आले आहेत.
याचवेळी चित्रपटगृहे, मल्टीप्लेक्स इ. 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी आहे. याच धर्तीवर अशा समारंभानाही 50 टक्के क्षमतेनं अथवा जास्तीत जास्त 200 उपस्थितीच्या मर्यादेत यापैकी जे कमी असेल त्या संख्येनं समारंभ/कार्यक्रम आयोजित करण्यासाठी परवानगी असणं आवश्यक आहे.
ललित गांधी यांनी शाळांच्या संदर्भात आपली भूमिका मांडताना म्हटले आहे की, "शाळा-महाविद्यालयं 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन शैक्षणिक वर्षात ऑनलाईन पध्दतीनं शाळांचे वर्ग चालविण्यात आले, त्याचा फार मोठा दुष्परिणाम मुलांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबर, मानसिक अवस्था आणि व्यक्तिगत जीवनावर झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेतील निर्बंध उठवून शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा ऑनलाईन पध्दतीनं शिकलेला अभ्यासक्रम विसरला असल्याचं 70 टक्के विद्यार्थ्यांनी नमुद केलं आहे. अनेक विद्यार्थी मोबाईल वापराच्या आहारी गेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना काऊन्सिलिंग वैद्यकीय उपचारांची गरज पडत आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यांमध्ये दृष्टीविकार निर्माण झाले आहेत. अनेक प्राथमिक, उच्च प्राथमिक स्तरावरील विद्यार्थी पॉर्न फिल्म्सच्या आहारी गेल्याच्या तक्रारी पालकांकडून प्राप्त होत आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्यामध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण अत्यल्प आहे. तसेच 8 वी च्या पुढील विद्यार्थ्यांचे लसीकरण पुर्णत्वाकडे आहे. तरी 50 टक्के क्षमतेने शाळा सुरू ठेवण्याची परवानगी देण्याची आग्रही मागणी आहे, असं ते म्हणाले.
देशाच्या भावी नागरीकांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि सामाजिक दुष्परिणाम रोखण्यासाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय तात्काळ घेणे आवश्यक आहे. मद्यालयं सुरू आणि विद्यालयं बंद असे विदारक चित्र निर्माण होत आहे, ते बदलणे आवश्यक आहे, असंही ते म्हणाले.
कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजनांच्या पालनासाठी आम्ही कटीबध्द आहोत. मात्र अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्था सुरळीत चालब राहण्यात मदत होणेसाठी वरील दोन सुधारणांचे आदेश तात्काळ निर्गमित व्हावेत अशी अपेक्षाही ललित गांधी यांनी व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- कोरोनाच्या उपचारात 'मोलनुपिरावीर' औषधाचा समावेश नाही : ICMR
- Omicron Symptoms: लहान मुलं आणि तरूणांमध्ये ओमिक्रॉनची लक्षणं वेगळी, कसं ओळखायचं? घ्या जाणून
- India Corona Test Guidelines : ...तरच कोरोना चाचणी करा; आयसीएमआरची नवी नियमावली
- Omicron in India : तिसर्या लाटेचा कहर? ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या चार हजारांवर, पाहा तुमच्या राज्यातील परिस्थिती
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह