(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चित्रा वाघ यांच्याकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा 'तो' व्हिडीओ ट्वीट; पटोले न्यायालयात
Chitra Wagh Tweet Nana Patole Video : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा व्हायरल होणारा व्हीडिओ चित्रा वाघ यांनी ट्वीट केला असून या व्हिडीओविरोधात नाना पटोले न्यायालयात धाव घेणार आहेत.
Chitra Wagh Tweet Nana Patole Video : गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. अशातच सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओची चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ आहे, महाराष्ट्र (Maharashtra) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा (Maharashtra Congress President Nana Patole). भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये नाना पटोले एका महिलेसोबत चेरापुंजीत असल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून माध्यमांशी बोलताना व्हिडीओविरोधात न्यायालयात जाणार असल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे चित्र वाघ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नाना पटोलेंवर नेटकऱ्यांनी निशाणा साधला. याबाबत बोलताना नाना पटोलेंनी चित्रा वाघ यांच्याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचं स्पष्ट केलं. तसेच हा बदनाम करण्याचा कट असून व्हिडीओविरोधात कारवाई करणार असल्याचंही ते म्हणाले. नेटकऱ्यांनीही नाना पटोले यांना आज चांगलेच ट्रोल केले. मेघालय राज्याच्या चेरापुंजी येथील एका हॉटेलमध्ये महिलेसोबत गळ्यात हात टाकून खुर्चीवर बसल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला. त्यामुळे नानांच्या विरोधात टीकेची झोड उठलेली आहे. मात्र या दरम्यान नाना पटोले यांना विचारपूस केली असतां त्यांनी हे भाजपचा कट कारस्थान असल्याचा आरोप केलाय. या विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचंही नाना पटोले म्हणाले. महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी खालवली असून माझी वैयक्तिक बदनामी करण्यासाठी 'तो' व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आहे. यावर आमची लिगल टीम तपासणी करत असून गरज पडल्यास न्यायालयातही जाण्याची आमची तयारी असल्याची प्रतिक्रीया कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. मुंबई जाण्यासाठी निघाले असताना नागपूर विमानतळावर पत्रकारांशी ते संवाद साधत होते.
चित्रा वाघ यांच्याकडून व्हिडीओ ट्वीट
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या चित्रा वाघ यांनी बुधवारी एक व्हिडीओ ट्वीट केला. ज्यामध्ये नाना पटोले चेरापुंजीतील एका हॉटेलमध्ये महिलेसोबत असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. "हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माझ्याकडे व्हिडीओ आला. मी पाहिल्यानंतर आश्चर्य वाटलं. त्यामुळे मी पुन्हा एकदा चेक केलं आणि बराच ठिकाणी तो व्हिडीओ व्हायरल झाल्याचं समजलं. महाराष्ट्रातल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा तो व्हिडीओ व्हायरल झालाय आणि म्हणूनच एकंदरीत राजकीय वातावरणामध्ये ज्या काही गोष्टी घडताना दिसतात आणि त्याच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. सोलापूर, रायगड, नाना पटोले असूदे किंवा कोणताही पक्ष असूदे ज्यावेळी तुम्ही लोकप्रतिनिधी असता, तेव्हा तुमची जबाबदारी कित्येकपटीने वाढलेली असते. सर्वांनी जबाबदारीने वागलं पाहिजे. यातून लोकप्रतिनिधींकडून लोकांनी काय बोध घ्यावा? असा प्रश्न उपस्थित होतोय, असं चित्रा वाघ म्हणाल्या.
प्रकरण नेमकं काय?
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी बुधवारी एक व्हिडीओ ट्वीट केला. या व्हिडीओमध्ये महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले एका चेरापुंजी येथे महिलेसोबत फिरताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नाना पटोले यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. तसेच, सोशल मीडियात नाना पटोलेंविरोधात टीकेची झोड उठवली आहे. मात्र या दरम्यान नाना पटोले यांच्याकडे विचारपूस केली तेव्हा त्यांनी हे भाजपचा कट कारस्थान असल्याचा आरोप केला. तसेच, या विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचा उल्लेखही नाना पटोले यांनी केला आहे.