Lok Sabha Election : रामटेक लोकसभा मतदारसंघातील सस्पेन्स कायम! काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री नितीन राऊत मैदानात?
Lok Sabha Election : काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत रामटेकच्या उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसमधून अनेक नावांची चढाओढ लागली असतांना काँग्रेस नेतृत्व वेगळा तोडगा काढण्याच्या तयारीत आहे.
Maharashtra Politics: काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत रामटेकच्या उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. बुधवारी रात्री दिल्ली येथे पार पडलेल्या काँग्रेसच्या बैठकीत काँग्रेसनं (Congress) राज्यातल्या 18 जागा लढवण्यावर निर्णय घेतला आहे. तर राज्यातील केवळ सात जागांचा निर्णय झाला असून उर्वरित जागांचा निर्णय अद्यापही होणे बाकी असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले (Nana Patole) यांनी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या संभाव्य उमेदवाराबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहे. तर दुसरीकडे नागपूर मधल्या रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसमधून अनेक नावांची चढाओढ लागली असतांना काँग्रेस नेतृत्व वेगळा तोडगा काढण्याच्या तयारीत आहे.
जागावाटपाबाबत काँग्रेस नेतृत्वाचा मोठा निर्णय
रामटेक लोकसभा मतदारसंघात युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेसमधून किशोर गजभिये, रश्मी बर्वे, राजू पारवे, अशा अनेक नावांची चर्चा आहे. मात्र या उमेदवारी बाबत काँग्रेसमध्ये वाढता गोंधळ पाहता काँग्रेस नेतृत्व वेगळा तोडगा काढण्याच्या तयारीत आहे. ज्या उमेदवारामध्ये निवडून येण्याची क्षमता आहे, ज्या उमेदवाराचा सर्वे अहवाल सकारात्मक आहे, त्यांच उमेदवारांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न काँग्रेसचा वतीने करण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांच्या मुलांना उमेदवारी देणे काँग्रेसने टाळल्याचे दिसतंय.
रामटेकसाठी कुणाल राऊत आणि चंद्रपूरसाठी शिवानी वडट्टीवार यांचा विचार करण्यापेक्षा निवडून येणाऱ्या उमेदवारालाच उमेदवारी देण्याकडे काँग्रेस पक्षश्रेष्ठीने लक्ष केले आहे. त्यामुळे रामटेक लोकसभा मतदारसंघातून कुणाल राऊत ऐवजी त्यांचे वडील नितीन राऊत यांना उमेदवारी मिळण्याची अधिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. नितीन राऊत हे विदर्भातील काँग्रेस पक्षातले मोठे नाव असून त्यांना उमेदवारी मिळाल्यास निवडून येण्याच्या विश्वास काँग्रेस पक्षश्रेष्ठीने दाखवल्याचे बोलले जात आहे.
विदर्भात काँग्रेसची डोकेदुखी वाढण्याची शक्यता
अशातच, काँग्रेसच्या वतीने रामटेक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या संभाव्य उमेदवार रश्मी बर्वे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता बळावली आहे. जात वैधता प्रमाणपत्राबाबत काँग्रेसच्या नेत्या रश्मी बर्वेंना जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने नोटीस बजावली आहे. त्यामुळे विदर्भात काँग्रेसची आणखी डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नागपूरच्या जिल्हा जात पडताळणी समितीला एक तक्रार प्राप्त झाली होती. ज्यामध्ये असे नमूद करण्यात आले होते की रश्मी बर्वे यांनी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी चुकीची माहिती आणि बनावट कागदपत्र दाखल केली आहेत. जिल्हा जात पडताळणी समितीने याबाबत तपासणी केली असता त्यातील अहवालात काही संशयास्पद माहिती आढळून आली. यावरून रश्मी बर्वेंना उत्तर देण्यासाठी जात पडताळणी समितीने नोटीस बजावली आहे.
रश्मी बर्वे या रामटेक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असून त्यांचे नाव आघाडीवर होते. त्यासाठी नागपूर काँग्रेसमधील सुनील केदार गटाने कसोशीने प्रयत्न केल्याचे देखील बोलले जात आहे. मात्र ऐनवेळी जिल्हा जात पडताळणी समितीने नोटीस बजावल्याने निश्चित रश्मी बर्वे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात रश्मी बर्वे यांच्या उमेदवारी बाबत काय होणार, सोबतच त्या जात पडताळ समितीला काय उत्तर देतात, हे पाहणे उत्सुकतेच ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या