एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सह्याद्रीच्या लेकीनं राखली हिमालयाची शान
मुंबई : साताऱ्याच्या ललिता बाबरनं रिओ ऑलिम्पिकमध्ये तीन हजार मीटर्स स्टीपलचेसची फायनल गाठून भारताची खरोखरच शान राखली. रिओ ऑलिम्पिकच्या ट्रॅक अँड फिल्ड प्रकारात एकामागोमाग एक भारतीय अॅथलिट्स लाजिरवाणी कामगिरी बजावत असताना ललितानं मात्र देशाची शान राखली आणि म्हणूनच ललिता बाबरच्या कामगिरीनं महाराष्ट्राचीही मान उंचावली आहे.
साताऱ्याच्या मोही गावातल्या ललिता बाबरच्या कामगिरीचं वैशिष्ट्य म्हणजे तिनं स्टीपलचेसची फायनल गाठताना नवा राष्ट्रीय विक्रमही रचला. बीजिंगमधल्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत स्टीपलचेसची फायनल गाठताना ललितानं नऊ मिनिटं 27.86 सेकंदांची वेळ दिली होती. तीच ललिताची आजवरची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी होती. त्यानंतर सुधासिंगनं नऊ मिनिटं आणि 26.55 सेकंदांची वेळ देऊन राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर जमा केला होता. पण रिओच्या ट्रॅकवर ललितानं नऊ मिनिटं 19.76 सेकंद ही नवा राष्ट्रीय विक्रम देणारी वेळ देऊन स्टीपलचेसची अंतिम रेषा पार केली. स्टीपलचेस शर्यतीत उतरलेल्या 52 जणींमध्ये तिनं दिलेली वेळ ही सातव्या
क्रमांकाची ठरली.
ऑलिम्पिकच्या इतिहासात ट्रॅक अँड फिल्ड प्रकारांची फायनल गाठणारी ती भारताची दहावी अॅथलीट ठरली. 1948 सालच्या लंडन ऑलिम्पिकमध्ये लांब उडीत बलदेव सिंग आणि तिहेरी उडीत हेन्री रिबेलो यांनी फायनल गाठण्याची कामगिरी बजावली होती. पण दुखापतीमुळे त्यांना फायनलमध्ये सहभागी होता आलं नव्हतं. त्यामुळे आजवर ऑलिम्पिकच्या ट्रॅक अँड फिल्ड प्रकारांमध्ये सातच
भारतीय अंतिम फेरीत दाखल झाले आहेत.
1960 सालच्या रोम ऑलिम्पिकमध्ये मिल्खासिंग यांनी 400 मीटर्स शर्यतीची अंतिम फेरी गाठली होती. मग 1964 साली गुरबचनसिंग रंधावा यांनी 110 मीटर्स हर्डल्स प्रकारात आणि 1976 साली श्रीरामसिंग यांनी 800 मीटर्स शर्यतीत ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. 1984 साली पी. टी. उषानं 400 मीटर्स हर्डल्सच्या फायनलमध्ये धडक मारली होती. 2004 साली अंजू बॉबी जॉर्जनं लांब उडीची फायनल गाठण्याचा पराक्रम गाजवला. मग 2012 साली कृष्णा पुनिया आणि विकास गौडा यांनी थाळीफेकीत अंतिम फेरीत स्थान मिळवलं होतं. ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या या दिग्गजांच्या पंक्तीत आता आपली ललिता बाबर आठव्या क्रमांकावर दाखल झाली आहे.
ललिताचं हे यश महाराष्ट्रातल्या अॅथलेटिक्सला नवं बळ देणारं आहे. पण तिनं रिओ ऑलिम्पिकमध्ये तीन हजार मीटर्स स्टीपलचेसची फायनल गाठून करोडो भारतीयांच्या पदकाच्या अपेक्षाही उंचावल्या आहेत. पण प्राथमिक फेरीतल्या कामगिरीच्या निकषावर ललिताकडून पदकाची अपेक्षा करायची का? जाणकारांच्या मते, ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये ललिता बाबर स्टीपलचेसच्या नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद करेल, याबाबत त्यांना अजिबात शंका नाही. पण भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या म्हणजे पंधरा ऑगस्टच्या सायंकाळी होत असलेल्या स्टीपलचेसच्या फायनलनंतर ललिता बाबरनं आपल्याला राष्ट्रीय तिरंगा उंचावण्याची पुन्हा संधी द्यावी, अशी प्रत्येक कॉमनमॅनची
इच्छा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement