(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shimga Guidelines | शिमगोत्सवावर कोरोनाचं सावट, रत्नागिरी जिल्ह्यात नियमावली जाहीर
कोकणातील शिमगा म्हणजे चाकरमान्यांच्या हृदयातला हळवा कोपरा. पण यंदा शिमगोत्सवाच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यासाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
रत्नागिरी : कोकणातील शिमगा म्हणजे चाकरमान्यांच्या हृदयातला हळवा कोपरा. कोकणातील माणूस कामधंद्यासाठी कितीही लांब गेलेला असला तरी होळी आणि गणेशोत्सवासाठी अवश्य गावाला जातो. शिमगा म्हटला की कोकणी माणसाच्या अंगात संचारतं, शिमग्याची पालखी त्याच्या डोक्यात नाचू लागते, बोंबा कानात घुमतात. पण यंदाच्या शिमगोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. शिमगोत्सवाच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यासाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
कोविड-19च्या अनुषंगाने यंदा सर्व धर्मियांचे सण, उत्सव तसंच सर्व सार्वजनिक कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नसून सध्या रत्नागिरी जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. तसंच शिमगोत्सवासाठी मुंबई-पुण्यावरुन नागरिक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिस्थितीचा विचार करत यंदा रत्नागिरी जिल्ह्यात शिमगोत्सव, होळी उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करणं आवश्यक आहे, असं जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे.
शिमगोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील नियमावली
1. सर्व मंदिर विश्वस्त आणि पालखीधारकांनी लगतच्या आरोग्य यंत्रणेकडून कोरोना चाचणी करुन घ्यावी.
2. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत ग्रामदेवतेच्या पालखीला रुपं लावणे किंवा पालखी सजवणे बंधनकारक
3. 25 ग्रामस्थ आणि मानकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी परंपरेनुसार भेटीला जाणार
4. होळी आणि पालखीची पूजा, नवस, पेढे, पार, नारळ, इत्यादी स्वरुपात स्वीकारु नयेत. तसेच प्रसाद वाटपही करु नये.
5. पालखी सहाणेवर नेतेवेळी दर्शनासाठी प्रत्येक वाडीतील, भागातील लोकांना स्वतंत्र दिवस नेमून द्यावा. किंवा 3-3 तासांचा कालावधी द्यावा जेणेकरुन गर्दी होणार नाही.
6. पालखी घरोघरी नेण्यात येऊ नये.
7. पालखी गर्दीमध्ये नाचवता येणार नाही.
8. गावात खेळे, नमन इत्यादी लोककलेचे कार्यक्रम करु नयेत.
9. पालखी पारंपरिक सण असल्याने छोट्या-छोट्या होळ्या आणून मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत साजरा करावा.
10. प्रथेपुरते खेळ्यांचे उपक्रम 25 ते 50 लोकांच्या उपस्थितीत करावेत.
11. धुलिवंदन, रंगपंचमीच्यी दिवशी रंग उधळणे टाळावे.
12. मुंबईतील चाकरमान्यांना शक्यतो न येण्याचे आवाहन करावे.
13. मुंबई, पुणे किंवा इतर भागातून होळीकरता येणाऱ्या नागरिकांचे 72 तासांपूर्वी केलेल्या RTPCR चाचणीचे निगेटिव्ह अहवाल असणे बंधनकारक