प्रशासनाचं नेटकं नियोजन, कोल्हापूरकरांची साथ; कोरोनाचा रिकव्हरी रेट राज्यात अव्वल
राज्यात मुंबई, पुणे औरंगाबादासारख्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र त्याच वेळी कोरोनावर मात करण्यात कोल्हापूर जिल्हा अग्रस्थानी आहे.
कोल्हापूर : संपूर्ण देशात कोरोना व्हायरसचं संकट थैमान घालत आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण आपल्या राज्यात आढळून आले. अशावेळीदेखील कोल्हापूर जिल्ह्याचा रिकव्हरी रेट सर्वात जास्त आहे. कोरोनावर मात करण्यात राज्यात कोल्हापूर जिल्हा हा अग्रस्थानी आहे. जिल्हा प्रशासनाचे नेटकं नियोजन, पोलीस दलाने घेतलेली मेहनत, पालिकेने वेळोवेळी उचललेली कठोर पाऊलं आणि कोल्हापूरकरांनी केलेले नियमांचे पालन यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचा रिकव्हरी रेट सुमारे 94 टक्के आहे. 750 पैकी 703 रुग्ण बरे होऊन परतले आहेत. तर 8 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 39 रुग्ण सध्या उपचार घेत असून लवकरच कोल्हापूर जिल्हा कोरोनामुक्त होऊ शकतो. पण त्यासाठी कोल्हापूरकरांना अजून सतर्क राहणं गरजेचं आहे.
काय म्हणाले कोल्हापूरचे जिल्हाधिकारी? कोल्हापूर जिल्ह्यातील सध्याचे वातावरण जरी चांगले असले तरी काळजी घेणं हे आपलं पाहिलं कर्तव्य आहे. रुग्ण कमी झाले म्हणून आपण बेफिकीर वागून चालणार नाही. नागरिकांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन केले आहे. यापुढे देखील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे तरच आपण कोरोनावर मात करु शकतो.
कोल्हापूर जिल्ह्यात रेड झोनमधून येणाऱ्यांची संख्या कमी नाही. आजही दररोज दोन हजार लोक कोल्हापुरात येत आहेत. शिवाय कोल्हापूरकरांचा मुक्तपणे सुरु झालेला वावर संकटाला कधीही जादाची संधी देऊ शकतो.
कोल्हापूर जिल्ह्यात नियोजन कसे होते?
- ऑनलाईन पास मिळण्याआधी कोल्हापुरात केवळ 4 कोरोनारुग्ण होते
- त्यानंतर पुणे-मुंबई आणि रेडझोन मधून येणाऱ्या नागरिकांचे सक्तीने स्वॅब घेतले
- 14 दिवस सक्तीने क्वारंटाईन करण्यावर अधिक भर दिला
- छुप्या पद्धतीने येणाऱ्यांवर कडक कारवाई केली, त्यामुळे अधिकृतपणे येणाऱ्यांची संख्या वाढली
- त्याचा क्वॉरन्टाईनचे नियोजन करण्यात खूप मदत झाली
आतापर्यंत कोल्हापूरने सर्व नियमांचे पालन केले. पण अजून संकट पूर्णपणे टळलेलं नाही. रिकव्हरी रेटचा आनंद असाच राहायचा असेल तर आपण अजून सतर्क होणं गरजेचं आहे. अन्यथा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणारा कोल्हापूर जिल्हा कधीच कोरोनामुक्त होणार नाही.