(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur Municipal Corporation : पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेत सर्वाधिक कर्ज वितरणात कोल्हापूर मनपा राज्यात अव्वल
महाराष्ट्र राज्याच्या प्रधान सचिवांचे अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीमध्ये पी.एम.स्वनिधी योजनेंतर्गत महानगरपालिकेने उत्कृष्ट काम केल्याबद्दल प्रधान सचिवांनी महानगरपालिकेच्या कामाचे कौतुक केले.
Kolhapur Municipal Corporation : पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेत सर्वाधिक कर्ज वितरणात कोल्हापूर महानगरपालिका राज्यात अव्वल आली आहे. शुक्रवारी महाराष्ट्र राज्याच्या प्रधान सचिवांचे अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीमध्ये पी.एम.स्वनिधी योजने अंतर्गत महानगरपालिकेने उत्कृष्ट काम केल्याबद्दल प्रधान सचिवांनी महानगरपालिकेच्या कामाचे कौतुक केले आहे.
कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये आर्थिक अडचणीत आलेल्या फेरीवाल्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी (PM SAVNidhi) योजना केंद्र शासनाने सुरू केली. प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली उप-आयुक्त शिल्पा दरेकर यांच्या नियंत्रणाखाली पंतप्रधान पथ विक्रेता योजनेअंतर्गत महानगरपालिकेने मागील दोन वर्षात 7231 लाभार्थ्यांना तब्बल 9 कोटी 12 लाख रुपये बँकांमार्फत कर्ज वितरीत केले आहे. या आत्मनिर्भर योजनेला सुरुवात जून 2020 साली झाली. यामध्ये फेरीवाल्यांचे कर्जासाठी 7858 अर्ज आलेत. यामध्ये कर्ज मंजूर झालेले फेरीवाले 7490 आहेत. यापैकी 7231फेरीवाल्यांना कर्ज वितरण झाले आहे. यामध्ये दहा हजार कर्ज घेतलेले लाभार्थी 5375 आहेत. तर वीस हजार कर्ज घेतलेले लाभार्थी 1836 व पन्नास हजार कर्ज घेतलेले लाभार्थी 20 आहेत.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लॉकडाऊनमुळे पथविक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला होता. व्यवसाय बंद राहिल्यामुळे उदरनिर्वाह कसे करायचे हा प्रश्न त्याच्यासमोर होता. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर भांडवल नसल्याने पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्याचे मोठे आवाहन होते. यावेळी केंद्र शासनाच्या पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेमुळे फेरीवाल्यांना आधार मिळाला. या योजनेमध्ये मुदतीत कर्ज फेडणाऱ्यांना सात टक्के व्याज अनुदान दिले जाते. व्याज अनुदानाची रक्कम कर्जदाराच्या खात्यात प्रत्येक तीन महिन्यांनी जमा केली जाते. तसेच डिजिटल व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी डिजिटल माध्यमातून व्यवहार करणाऱ्या विक्रेत्यांना बाराशे पर्यंतची कॅशबॅक सुविधा देखील देण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या