मनोज जरांगेंचं महत्व कमी करण्यासाठी सुरेश धसांचा वापर, जितेंद्र आव्हाडांचा मोठा आरोप
Santosh Deshmukh Murder Case : मनोज जरांगे यांच्या चेहऱ्यावर मराठा समाजाप्रती असलेली प्रामाणिक भावना दिसते. त्याला छेद देण्यासाठी सुरेश धस यांचा वापर करण्यात आला असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

मुंबई : मनोज जरांगे यांचे महत्व कमी करण्यासाठीच आमदार सुरेश धसांचा वापर करण्यात आला असा मोठा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यामध्ये साडेचार तासांची चर्चा झाल्याची बातमी बावनकुळे यांनीच फोडली. त्यावेळी या दोघांमध्ये टू द पॉईंट चर्चा झाली असेल असा आरोपही आव्हाड यांनी केला. तसेच राजीनाम्यासंदर्भात इशारा देऊनही अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊ शकत नाहीत, ते हेल्पलेस झालेत असंही आव्हाड म्हणाले. जितेंद्र आव्हाड हे मंगळवारी बीड दौऱ्यावर जाणार असून त्या आधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
जरांगेंचं महत्व कमी करणयासाठीच धसांचा वापर
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांचं महत्त्व कमी करण्यासाठी आमदार सुरेश धस यांचा वापर झाला. सुरेश धस चांगले वक्ते आहेत. एका जनसमुदायाला ते खेळवून ठेवू शकतात. लोकांना मोहीत करण्याची कला त्यांना अवगत आहेत. ती कला मनोज जरांगे यांच्याकडे नाही. जरांगे पाटील यांच्याकडे कमिटमेंट आहे. जरांगे पाटील यांच्या चेहऱ्यावर समाजाप्रती असलेली प्रामाणिक भावना दिसते. या सगळ्याला छेद देण्यासाठी सुरेश धस यांचा वापर करण्यात आला.
धनंजय मुंडे यांना तुम्ही शत्रू मानत होतात आणि त्याच शत्रूसोबत साडेचार तास चर्चा करता. यातच तुमच्या युद्धातली सगळी दाहकता, तीव्रता संपते अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी सुरेश धसांवर केली.
कोणत्या तोंडांने सांगताय...
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "सोमनाथ सूर्यवंशी यांच्या बाबतीत बोलताना त्याच्या आईला त्यांनी सांगितले की पोलिसांना माफ करून टाका. पोटचा गोळा गेला आहे त्या आईचा. कोणत्या तोंडाने तुम्ही बोलताय की माफ करा. जेव्हा सोमनाथ सूर्यवंशीची आई खरंच सांगेल तेव्हा महाराष्ट्राच्या अंगावर काटे उभे राहतील."
साडेचार तास कशावर चर्चा केली?
सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये झालेल्या भेटीवर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे साडेचार तास चर्चा करतात हे खटकणारं आहे. मला धनंजय मुंडे रस्त्यावर भेटले तरी मी त्यांना बोलेन. पण साडेचार तास चर्चा केल्यानंतर लोक संशयांने बघणार. जो माणूस त्या व्यक्तीवर आरोप करतो तो माणूस साडेचार तास भेटतो हे अनाकलनीय आहे. साडेचार तास मी भेटतात तेव्हा बीडच्या वातावरणावर बोलता का? चर्चा टू द पॉईंट झाली असेल."
अजित पवारांचा राजीनाम्याचा निर्णय योग्य होता
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "अजित पवार जे बोलतात ते खरं आहे. त्यांच्यावर जेव्हा आरोप झाले होते तेव्हा त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला होता. तेव्हा बहुसंख्य आमदारांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही राजीनामा देऊ नका. महाराष्ट्राची परंपरा आहे जेव्हा मोठे आरोप होतात आणि ज्यावेळी चौकशी लागते तेव्हा ती व्यक्ती सत्तेच्या वर्तुळातून बाहेर पडते. सत्तेच्या सोबत राहिलेल्या त्या माणसाला पोलिसांचा अभय मिळतं. अजित पवारने त्यावेळी घेतला निर्णय योग्य होता."
नैतिकता ही तुम्हाला कुणी शिकवावी लागत नाही, हे मनावर असतं. अजित पवार यांनी धनंजय मुंडेंना एक इशारा दिला की मी राजीनामा दिला होता. समोरच्याने समजून घ्यायला हवं की आपला पक्षप्रमुख म्हणतोय की मी राजीनामा दिला होता, याचा अर्थ तू पण दे. पण अजितदादा यांची घुसमट झाली आहे. त्यांना सांगता येत नाही आणि सहनही होत नाही. अजितदादा कधी नव्हे एवढे असहाय्य दिसत आहेत.
पैशाचा पाऊस पाडावा
एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री सहायत्ता मदत कक्ष उभारला आहे. त्यावर बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "उपमुख्यमंत्र्यांनी मदत कक्ष उभारला त्यामुळे महाराष्ट्राचे भलं होईल. नागरिकांना वैद्यकीय मदत व्हायला आता आणखी सोपे जाईल. पैसे सगळ्यांकडे भरपूर आहेत. या सगळ्या पैशाचा वापर करावा. दोन-चार मदतीचे कक्ष उभे करावे आणि पैशांचा पाऊस पडावा."
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

