Bajrang Sonwane : सुरेश धस-धनंजय मुंडेंची भेट 18-19 दिवसांपूर्वी, थोडं थांबा, गुपित बाहेर येईल; बजरंग सोनवणेंचा दावा
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरण हे आमच्या जिव्हाळ्यांचं झालं असून बीडमधील दहशत मोडून काढण्यासाठी सर्व प्रयत्न करणार असल्याचं खासदार बजरंग सोनवणे म्हणाले.

बीड : सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या दोन भेटींमध्ये नेमकं काय झालं माहिती नाही. पण थोडं दिवस थांबा, त्या भेटीमधील गुपित बाहेर येईल असं वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केला. या दोन्ही नेत्यांमध्ये 18-19 दिवसांपूर्वीच भेट झाल्याची माहितीही त्यांनी दिली. संतोष देशमुख प्रकरण आता आमच्यासाठी जिव्हाळ्याचे प्रकरण बनलं असल्याचंही ते म्हणाले.
बावनकुळे यांनी सुरुवातीला 15 ते 20 दिवसापूर्वी अशी बैठक झाल्याचे सांगितलं आणि ते आता सांगताहेत की 27 ते 28 दिवसांपूर्वी अशी बैठक झाली. पण माझ्या मते 18 ते 19 दिवसांपूर्वी त्यांची बैठक झाली वेळ प्रसंगी ती सगळी माहिती मी देणार आहे असं बजरंग सोनवणे म्हणाले.
बंद दाराआडची चर्चा समोर येईल
खासदार बजरंग सोनवणे म्हणाले की, "खरंतर सुरेश धस यांना मीडियाने विचारलं तुमची आणि बावनकुळे साहेबांची भेट झाली का? तर सुरेश दादांनी दोन भेटी झाल्याचे सांगितलं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की, सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची पहिली भेट जेवण्यासाठी झाली असेल आणि दुसऱ्यांदा धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी सुरेश धस यांनी त्यांची भेट घेतली असेल. त्या बैठकीकडे कसे बघायचे हे प्रत्येकाचे दोन अँगल असू शकतात. बंद दाराआड नेमकी कोणती चर्चा झाली ही मी तुम्हाला नक्की सांगतो. त्यासाठी थोडीशी वाट पाहा."
बीडची कायदा आणि सुव्यवस्था ढासळली
बजरंग सोनवणे म्हणाले की, "बीडमधील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली. देशमुखांची निर्घुणपणे हत्या केली कारण बीडवर त्यांना दहशत निर्माण करायची होती. संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आलं आणि त्यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या कुटुंबीयांसाठी आम्ही न्याय मागतोय."
सुप्रिया सुळेंचा बीड दौरा
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी सुप्रिया सुळे या मंगळवारी मस्साजोगमध्ये जाणार आहेत. या सोबतच महादेव मुंडे यांचा खून 14 ते 15 महिन्यांपूर्वी झाला होता. मात्र आता पुन्हा त्या खुनाच्या तपासाला सुरुवात झाली आहे. मस्साजोगनंतर सुप्रिया सुळे या परळीमध्ये महादेव मुंडे कुटुंबीयांचीही भेट घेणार आहेत.
या दौऱ्यामध्ये सुप्रिया सुळे यांच्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड सुद्धा असणार आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी सुरुवातीपासूनच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये आवाज उठवला होता. आता प्रत्यक्ष भेटीनंतर आव्हाड नेमकी कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
