साडेचार तासात या दोघांनी काय केलं? तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा, जितेंद्र आव्हाडांचा धसांवर हल्लाबोल
आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. यावर आमदार जितेंद्र आव्हाडांनीही प्रतिक्रिया दिली.

Jitendra Awhad on Suresh Dhas : भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आमदार सुरेश धसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सुरेश धस हे धनंजय मुंडे साडेचार तास का भेटले असतील? याचे उत्तर कोणाकडे आहे का? साडेचार तासात या दोघांनी काय केलं असेल? असे सवाल करत आव्हाडांनी धसांवर टीका केली.
नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट साडेचार तास झाली. ही भेट चार दिवसांपूर्वी झाली, लपून वगैरे भेटले असं बोलणं आता योग्य वाटणार नाही असे आव्हाड म्हणाले.
यांच्याकडून मानवी स्वभाव जो असतो त्याचा अभ्यास करावा लागेल, डिसेंबरपासून धस हे धनंजय मुंडेंवरती तोफा डागत होते, अचानक म्हणतात मी राजीनामाच मागितला नाही. असू शकेल, आम्ही चुकीचं ऐकलं असेल, टीव्हीवाल्यांनी चुकीचं दाखवल असेल, पण हे प्रकरण उघड कसं आलं तर बावनकुळे यांनी सांगितलं की हे दोघे भेटले आणि मी होतो साडेचार तास भेटल्याचे आव्हाड यांनी सांगितलं.
साडेचार तास हे का भेटले असतील?
साडेचार तास हे का भेटले असतील? याचे उत्तर कोणाकडे आहे का? सध्या त्यांच्या वागण्यात फरक दिसतोय, धस सध्या अतिशय क्षमाशील झालेत, संत झालेत, संत परंपरेवर चाललेत असे आव्हाड म्हणाले. सोमनाथ सूर्यवंशीच्या आईला देखील त्यांनी सल्ला दिला की कोणी असेल त्यांना माफ करुन टाका तसं त्यांनी आज धनंजय मुंडेंना माफ केलं असेल असे आव्हाड म्हणाले. बातमी देण्याआधी सांगितलं असतं तर बरं झालं असतं कारण विश्वासार्हतेचा प्रश्न असतो. चार दिवसानंतर ही बातमी येते तेव्हा लोक संशयाने बघतात. एवढ्या प्रामाणिकपणाने हा माणूस लढत होता पण अचानक यु टर्न का मारलाय? हे कळायला मार्ग नाही असे आव्हाड म्हणाले.
साडेचार तासात या दोघांनी काय केलं असेल?
साडेचार तासात या दोघांनी काय केलं असेल? यावरून मला मराठीतलं एक गाणं आठवलं, भेटल्यावर या दोघांनी गळ्यात गळे तर घातलेच असतील तेव्हा हे गाणं म्हणाले असतील, तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा असा टोला आव्हाडांनी धसांना लगावला. महाराष्ट्राने दोन-तीन महिने जे बघितलं ते आता विसरून जायचं, जणू आमच्यात काय झालं नाही असं बोलायला हे मोकळे झाले. एखादा विषय हातात घेतल्यानंतर तो तडीस नेण हा स्वभाव गुण असतो आणि मध्येच सोडून देणार हा दुर्गुण असतो. दोघं भेटले यावर मला काही बोलायचं नव्हतं, दोघ मित्रच होते, बीडच्या राजकारणात दोघांचं सख्ख्य होतं असा टोला आव्हाडांनी लगावला.
राजीनामा घ्यायचाच असेल तो माननीय मुख्यमंत्री घेतील
अॅग्रीकल्चरचा घोटाळा बाहेर आला, हार्वेस्टरचा घोटाळा बाहेर आला, दहा रुपयाची वस्तू पन्नास रुपयाला घेतल्याचा घोटाळा बाहेर आला, माननीय एकनाथ शिंदेंवर टाकून मोकळे झाले. एकनाथ शिंदेंचा यामध्ये काहीही संबंध नसताना त्यांना देखील या प्रकरणात ओढून घेतल्याचे आव्हाड म्हणाले. अजित दादा आज म्हणाले मी राजीनामा घेणार नाही, आम्हाला माहीत होतं तुम्ही राजीनामा घेणार नाहीत. तुम्हाला सांगतोय कोण राजीनामा घ्यायला? राजीनामा घ्यायचाच असेल तो माननीय मुख्यमंत्री घेतील असे आव्हाड म्हणाले.
तुम्ही शेतकऱ्यांना फसवणार, कृषी खात्यात भ्रष्टाचार करणार, हार्वेस्ट मध्ये वाल्मीक कराड तुमचे पैसे जमा करणार, तुमच्या बंगल्यामध्ये मीटिंग होणार, वाल्मीक कराड म्हणणार तुमचा माणूस आणि तो मर्डर करणार, निवडणुकीदरम्यान कैलास फड नावाचा माणूस पूर्ण बूथ कॅप्चर करतो. तो तुमचा खास माणूस त्याच्यावर गुन्हा नोंदवला जातो. तो तुमचा स्टेटस ठेवणार, पोलीस त्याचं गुन्ह्यामध्ये नावही घेत नाही, यंत्रणा तुमच्या ताब्यात आहेत म्हणून आम्ही सांगतो तुमचा राजीनामा घ्यायला पाहिजे असे आव्हाड म्हणाले. आम्ही बहिरे होतो त्यांचा दोष नाही आम्हाला कमी ऐकायला येतं, महाराष्ट्राच्या लोकांच्या कानात कानाचा दोष निर्माण झालाय असेही आव्हाड म्हणाले. त्यांनी आणखीन एक गाणं म्हटलं असेल की ये दोस्ती हम नही तोडेंगे, नाहीतर असं देखील म्हटले असतील की दोस्त दोस्त ना राहा प्यार प्यार ना राहा असे म्हणत आव्हाडांनी धसांना टोला लगावला.
प्रेम व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी बाहेर पडलं
प्रेम व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी बाहेर पडलं, आधी रोज डे असतो नंतर हा डे असतो तो डे असतो नंतर व्हॅलेंटाईन डे असतो. रोज डे च्या दिवशी ते पुष्पगुच्छ घेऊन भेटले असतील आज व्हॅलेंटाईन डे ला बाहेर आलं. सगळे डे साजरे केले असतील त्यांनी असे म्हणत आव्हाडांनी धसांना टोला लगावला.




















