झाकली मूठ सव्वा लाखाची! आपले जमीन घोटाळे निघाले तर कुठपर्यंत जातील, मंत्री गोरेंचा रोहित पवारांना इशारा
आपले जमीन घोटाळे निघाले तर कुठपर्यंत जातील याचा विचार करावा आणि झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवावी, असा इशारा मंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार रोहित पवारांना दिला आहे.
Jayakumar Gore on Rohit Pawar : आपले जमीन घोटाळे निघाले तर कुठपर्यंत जातील याचा विचार करावा आणि झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवावी. झोपण्यापूर्वी याचा शांतपणे विचार करुन झोपा या शब्दात राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना गर्भित इशारा दिला आहे. रोहित पवार यांनी भाजप आणि महायुतीच्या नेत्यांचे जमीन घोटाळे समोर येत असल्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आज अकलूजमध्ये बोलताना जयकुमार गोरे यांनी थेट रोहित पवार यांना रात्री झोपण्यापूर्वी याचा विचार करावा असा इशारा दिला आहे.
अकलूज येथे भयमुक्त वातावरण देण्यासाठी भाजपला निवडून देण्याचे आवाहन
आज सांगोला आणि अकलूज येथे जयकुमार गोरे यांनी नगरपालिका निवडणुकी संदर्भात इच्छुक उमेदवार आणि इच्छुक नगरसेवकांच्या स्वतः मुलाखती घेतल्या. विशेष म्हणजे अकलूज आणि सांगोला या दोन्ही ठिकाणी भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी उदंड प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. अकलूज येथे भयमुक्त वातावरण देण्यासाठी भाजपला निवडून देण्याचे आवाहन करत मोहिते पाटील यांचे नाव न घेता जयकुमार गोरे यांनी जोरदार टीका केली. आज अकलूजमध्येही मोठ्या प्रमाणात भाजपकडून उमेदवारी मागण्यासाठी होणारी गर्दी हीच परिवर्तनाची नांदी असल्याचे त्यांनी सांगितले. अकलूजकरांना येथील व्यापारी डॉक्टर या सर्वांना आम्ही हे मुक्त अकलूज करण्याचा शब्द देत असल्याचे जयकुमार गोरे यांनी सांगितले आहे. यावेळी बोलताना गोरे यांनी बच्चू कडू यांनाही टोला लगावला.
अकलूजमधील लोकांना परिवर्तन पाहिजे
अकलूजमधील लोकांना परिवर्तन पाहिजे, स्वच्छ आणि भयमुक्त वातावरण पाहिजे असे जयकुमार गोरे म्हणाले. अकलुज शहरात विकासाभीमुख नेतृत्व देणे गरजेचे आहे. अकलूज शहारातील व्यापाऱ्यांना, डॉक्टरांना, सर्वसामान्य लोकांना जो त्रास होतोय तो संपला पाहिजे. त्यांना आपला व्यवसाय मनसोक्त करता आला पाहिजे अशी भूमिका भाजप घेत असल्याचे जयकुमार गोरे म्हणाले.
दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजयकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील सुरु झाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
























