(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तुकाराम महाराजांनीही बंडखोरी केली होती; बुलढाणेकर महाराजांचं कीर्तनातून शिंदे गटाचं समर्थन
Jalgaon : तुम्ही कोणत्याही पक्षात गेला तरी तुम्हीच विनर आहे, असं सांगत कीर्तनकार बुलढाणेकर महाराजांनी गुलाबराव पाटील यांचं समर्थन केलं.
जळगाव : राज्यात एकीकडे शिवसेनेतून बाहेर पडलेल्या बंडखोर आमदारांवर 50 खोके एकदम ओके असो की इतर अशा वेगवेगळ्या माध्यमातून सर्वत्र टिका होत असतांना दुसरीकडे प्रसिध्द किर्तनकार पुरूषोत्तम महाराज बुलढाणेकर यांनी त्यांच्या किर्तनातून बंडखोर आमदारांची बाजू घेती. बंडखोरांनी जे केलं ते योग्य असल्याचं सांगत त्याचं समर्थन केलं तर दुसरीकडे शिंदे गटातील आमदार हेच खरे शिवसैनिक असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
पाळधी येथे महाराणा प्रताप चौक मित्र मंडळ आणि जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील मित्र मंडळ यांचा संयुक्त विद्यामाने पाळधी येथे पुरुषोत्तम महाराज बुलढाणेकर यांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मंत्री गुलाबराव पाटील यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमात कुठलाही बडेजाव न करता मंत्री गुलाबराव पाटील हे इतर नागरिकांमध्ये प्रमाणे चक्क जमीनीवर बसून किर्तन ऐकत असल्याचं पाहायला मिळाले. तब्बल दोन तास मंत्री या पाटील या कीर्तनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. नागरिकांमध्ये गुलाबराव पाटील यांना जमीनीवर बसलेले पाहून इतरांना आश्चर्य वाटले नसेल तर नवलच.
काय म्हणाले कीर्तनकार?
यावेळी कीर्तनकार पुरूषोत्तम महाराज यांनी शिवसेनेसोबत आमदारांनी केलेल्या बंडखोरीवर भाष्य केलं. मंत्री गुलाबराव पाटील असो की इतर कुणी ज्यांनी ते केलं ते बरोबरच केलं हे सांगतांना तुकाराम महाराजांचाही यावेळी पुरूषोत्तम महाराज यांनी दाखला दिला. बंडखोरी पक्षात आहे असं नाही, तुकाराम महाराजांनीही बंडखोरी केली होती असे ते म्हणाले. तुझ्यासाठी मी कुटुंबाचा त्याग केला, माझी बायको अन्न-अन्न करत मेली, तरी मी तुझा परमार्थ सोडला नाही असे तुकाराम महाराज पाडुरंगाला उद्देशून म्हणाले होते. तसेच आमच्यामुळे तुझं वजन असल्याचेही तुकाराम महाराज पाडुरंगाला म्हणाले होते असेही पुरूषोत्तम महाराज म्हणाले. त्याचप्रमाणे ज्यांनी बंडखोरी केली, त्यांनी तळागाळात जावून शिवसेना वाढविली, ज्यांनी पक्षासाठी विविध आंदोलनं केली, टायर जाळली ते गद्दार आणि ज्यांची मुले विदेशात शिकतात ते महान? असा सवालही पुरूषोत्तम महाराज यांनी उपस्थित केला. ज्यांनी टायर जाळंली तेच खरे शिवसैनिक असेही पुरूषोत्तम महाराज म्हणाले .
ताण घेवून नका, तुम्ही कोणत्याही पक्षात गेले तरी विनरच
कुणावरही अत्याचार झाला की रस्त्यावर उतरुन आंदोलन करणारा महाराष्ट्रातला एकमेव पक्ष म्हणजे शिवसेना असल्याचेही पुरूषोत्तम महाराज म्हणाले. त्यामुळे तुम्ही कोणत्याही पक्षात गेले तरी तुम्हीच विनर आहे, असे त्यांनी गुलाबराव पाटील यांना उद्देशून म्हणाले. एकनिष्ठ असतानाही आपल्याच पक्षाचे मुख्यमंत्री जर ऐकत तर बंडखोरी होणारचं असेही पुरूषोत्तम महाराज म्हणाले. आपला मुख्यमंत्री असतांना तुमचा पक्ष चार नंबर या गोष्टी खटणाराच आहे, पण तो तुमचा विषय आहे. आम्हाला काही घेणं देणं नाही असल्याचेही पुरूषोत्तम महाराज म्हणाले. तसेच आम्ही ज्यावेळी मुख्यमंत्री होवू त्यावेळी बघू असं म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.