एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कल्याण-डोंबिवलीत रिक्षामध्ये चालकाची माहिती बंधनकारक
कल्याण : कल्याण आणि डोंबिवलीतील रिक्षाचालकांना यापुढे रिक्षामध्ये आपली माहिती लावणं बंधनकारक करण्यात आलंय. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वाहतूक विभागानं हा निर्णय घेतला आहे. वाहतूक विभागाच्या या निर्णयानंतर महिला प्रवाशांनी समाधान व्यक्त केलं आहे.
ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत मागील काही दिवसांत सलग घडलेल्या या घटना पोलिसांनी चांगल्याच गांभीर्यानं घेतल्या आहेत. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यास वाहतूक विभागानं सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांत घडलेले हे गुन्हे पाहता यात रिक्षाचालकांचा प्रमुख सहभाग असल्याचं आढळलं आहे. या प्रत्येक घटनेनंतर रिक्षाचालकाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांना प्रयत्नांची मोठी शिकस्त करावी लागली.
त्यामुळं यापुढे कल्याण-डोंबिवलीतील रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षात स्वतःची माहिती लॅमिनेशन करुन लावण्याचे आदेश वाहतूक विभागानं दिले आहेत. यासाठी वाहतूक विभागानं कल्याण-डोंबिवलीतील 15 हजार रिक्षाचालकांना नमुने वाटले आहेत. त्यांच्याकडून या अर्जाची एक प्रत वाहतूक विभागाला द्यावी लागणार आहे, तर वाहतूक विभागाचा शिक्का मारलेली दुसरी प्रत रिक्षेत लावावी लागणार आहे.
रिक्षाचालकांची यावर्षातील मुजोरीच्या घटना
19 मार्च 2017 : डोंबिवली रेल्वे स्थानकाबाहेर वाहतूक नियंत्रित करणा-या महिला होमगार्डचं रिक्षाचालकानं अपहरण करून केली मारहाण.
7 जून 2017 : ठाण्याच्या तीनहात नाक्यावरून रिक्षेत बसलेल्या तरुणीवर रिक्षाचालक आणि त्याच्या मित्रानं केला अतिप्रसंगाचा प्रयत्न
12 जून 2017 : डोंबिवलीच्या सोनारपाड्यात रिक्षाचालक आणि त्याच्या मित्रानं अल्पवयीन मुलीचं अपहरण करून केला विनयभंग
डोंबिवली आणि कल्याणमध्ये दररोज कामानिमित्त रिक्षाप्रवास करणाऱ्या हजारो महिला आहेत. त्यांना सुरक्षीतपणाची भावना येण्यासाठी वाहतूक विभागाच्या वतीनं ही मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेबाबत महिला प्रवाशांनी समाधान व्यक्त केलं आहे.
कल्याण-डोंबिवलीतल्या रिक्षाचालकांना रिक्षात आपली माहिती लावण्यासाठी 1 महिन्याची मुदत देण्यात आली आहे. या काळात जर त्यांनी ही माहिती लावली नाही, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळं येत्या काळात महिला सुरक्षिततेसाठी रिक्षाचालक या मोहिमेला प्रतिसाद देतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
मुंबई
निवडणूक
भारत
Advertisement