मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थ्यांचं कुलगुरुंच्या दालनात घुसून आंदोलन
वसतीगृहाच्या मुद्द्यावरुन अभाविप विरुद्ध रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते यावेळी आपसात भिडले.

औरंगाबाद : औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात चांगलाच राडा पाहायला मिळाला. वसतीगृहाच्या मुद्द्यावरुन अभाविप विरुद्ध रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते यावेळी आपसात भिडले.
संशोधन वसतीगृहात जुन्या विद्यार्थ्यांनी ठाण मांडल्यामुळे नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. तसेच विद्यार्थिनींच्या वसतीगृहात नियमित पाणी पुरवठा होत नाही. याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं सोमवारी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केलं.
यावेळी विद्यार्थ्यांनी दैनंदिन वापराच्या वस्तू दालनात मांडल्या होत्या. तसेच दोरी बांधून त्यावर टॉवेल, कपडे वाळत घातले होते.
या आंदोलनाला विरोध करत अभाविपचे कार्यकर्ते कुलगुरुंच्या दालनात आंदोलन कसे करतात? अशी विचारणा करत रिपब्लिकन सेना आणि काँग्रेस विद्यार्थी सेनेनं अभाविपच्या आंदोलनाला विरोध केला. विद्यापीठ परिसरात आंदोलन केल्यामुळे आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. अभाविपचे कार्यकर्ते कुलगुरुंच्या दालनात आंदोलन कसे करतात? अशी विचारणा त्यांनी केली.
यावेळी दोन्हीकडून रेटारेटी आणि धक्काबुक्की सुरू झाल्यामुळं प्रचंड गोंधळ झाला. अर्धा तास सुरू असलेल्या गोंधळात आंदोलक विद्यार्थी एकमेकांचं ऐकण्याच्या तयारीत नव्हते. हमरीतुमरीवर येत कार्यकर्ते मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करीत होते. अखेर सुरक्षारक्षकांनी धाव घेत आंदोलकांना बाहेर काढलं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
