महाराष्ट्रात जाती-जातीत भांडण लावणारा लांडगा कोण हे सर्वांना माहिती , गोपीचंद पडळकरांचा नाव न घेता शरद पवारांवर निशाणा
धनगर आरक्षणाची चळवळ थांबता कामा नये जोपर्यंत एसटी आरक्षण दाखला मिळत नाही तोपर्यंत कोणी शांत झोपू नये असे सभेत आवाहन केल्याचे पडळकर यांनी सांगितले .
सोलापूर: महाराष्ट्रात जातीजातीत कोण भांडणे लावते? रिपाईचे तुकडे तुकडे कोणी केले? बी के कोकणे यांच्या पाठीत खंजीर कोणी खुपसला ? धनगर समाजाला एसटीमध्ये आरक्षण देण्याचे असताना एनटीमध्ये कोणी दिले ? महाराष्ट्रात तो लांडगा असून त्याचे नाव राज्यातील सर्व लोकांना माहित असून आमचा सर्वसामान्य मेंढरांना काही त्या लांडग्याचे नाव सांगेल अशा शब्दात आज गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव न घेता निशाणा साधला. धनगर जागर यात्रेसाठी आज पडळकर हे माळशिरस तालुक्यातील विझोरी येथे आले असता होते . धनगर जागर यात्रेची आज सकाळी 10 वाजता विझोरी येथे सभा होती मात्र सकाळची वेळ असूनही मोठ्या संख्येने धनगर समाजाने (Dhangar) या यात्रेला हजेरी लावली होती .
आपले आणि आदिवासी समाजाचे भांडण नसून सध्या आमच्या विरोधात बोलत असलेले 10 टक्के आदिवासी हे 90 टक्के आदिवासी समाजाचे लाभ उठवत असल्याचा घणाघात पडळकर यांनी केला. राज्यात 1 कोटी 5 लाख आदिवासी समाज असला तरी केवळ पाच लाख लोकांकडेही एसटीचे दाखले नाहीत. आदिवासींच्या एकूण 47 जमातींपैकी 45 जमाती राज्यात अस्तित्वात असून यातील 33 जमाती या अन्यायग्रस्त असल्याचे त्यांनी सांगितले. धनगर समाजाला एसटी मध्ये घेण्यास विरोध करणारे हेच 10 टक्के आदिवासी असून त्यांनी आजवर 90 टक्क्यांच्या आमदारकी , खासदारकी, मंत्री पदे , शिक्षण , नोकऱ्यातील पदे आणि राज्य व केंद्राचा कोट्यवधींचा निधी खाल्ल्याचा दावा पडळकर यांनी केला . यासंदर्भात बोलणारा मी पहिला आमदार होतो ज्याने हे वास्तव अधिवेशनात समोर आणले. आताही या विषयावर मी आपली भूमिका अधिवेशनात मांडणार असून धनगर जागर यात्रेनंतर आदिवासी मधील अन्यायग्रस्त महादेव कोळी अशा 33 जमातींसाठी संपर्क अभियानास सुरुवात करणार असल्याचे पडळकर यांनी सांगितले.
धनगर आरक्षण घेतल्याशिवाय सोडायचे नाही
आपल्या सभेत बोलताना आपल्याला काही झाले तरी धनगर आरक्षण घेतल्याशिवाय सोडायचे नाही असे वक्तव्य त्यांनी केले होते . याबाबत छेडताच आपल्यावर यापूर्वी दोनवेळा प्राणघातक हल्ले झाले होते . धनगर समाज मोठा असल्याने याला हा जर जागा झाला तर आपल्या स्पर्धेमध्ये येऊ शकतो हे प्रस्थापितांना माहित आहे आणि जर हे थांबवायचे असेल तर गोपीचंदला थांबवावे लागेल त्यामुळे काही होऊ शकते म्हणून आपण भाषणात उल्लेख केल्याचे पडळकर यांनी सांगितले. त्यामुळेच काही जरी झाले तरी धनगर आरक्षणाची चळवळ थांबता कामा नये जोपर्यंत एसटी आरक्षण दाखला मिळत नाही तोपर्यंत कोणी शांत झोपू नये असे सभेत आवाहन केल्याचे पडळकर यांनी सांगितले .
हक्काचे आरक्षण लवकरच मिळेल
धनगर समाजाच्या आरक्षणाचा लढा आता अंतिम टप्प्यात आला असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रबोधन मंचाच्या केसाला 8 , 11 आणि 15 डिसेंबर अशा सलग तारखा मिळाल्या असून मधू शिंदे यांनी 170 पुरावे धनगर आरक्षणाच्या बाजूने सादर केले आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीस आणि शासनानेही धनगर आरक्षणासाठी मदत केली असून लागणारी कागदपत्रे सादर केल्याने आम्हला असलेले हक्काचे आरक्षण लवकरच मिळेल असा विश्वास पडळकर यांनी व्यक्त केला. आमची आदिवासी बांधवांशी कोणतीही लढाई नसून ज्या धनगड सोबत लढाई होती ती आता 2019 मध्ये संपल्याने आम्हाला आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याचे पडळकर यांनी सांगितले. यामुळेच गरज पडल्यास धनगर समाजाला एसटी मधील हक्काचे आरक्षण मिळण्यासाठी समाजाने रस्त्यावरील लढ्यास तयार राहावे हे आवाहन या जागर यात्रेतून करीत असल्याचे त्यांनी सांगितले. आजवर धनगर समाजाला सर्वांनी फक्त वापरून घेतल्याने आता भाजपकडूनच आरक्षणाबाबत अशा असल्याचे त्यांनी सांगितले.
गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण हे मिळालेच पाहिजे असे सांगत त्यांची मागणी रास्त असून आमचा त्यांच्या आरक्षणाला पाठिंबा असल्याचे पडळकर यांनी सांगितले . मराठा आरक्षणासाठी यापूर्वीही फडणवीस यांनी आरक्षण दिले होते त्याच पद्धतीने पुन्हा मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून त्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे असा दावाही पडळकर यांनी केला .