पोलीस भरतीची वाट पाहणाऱ्यांसाठी खुशखबर!, लवकरच 7 हजार 231 पदांची पोलीस भरती, गृहमंत्र्यांची माहिती
पोलीस भरती 2019 मधील रिक्त असलेल्या 5 हजार 297 पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून निवडलेल्या उमेदवारांनाची नेमणूक करणार असंही यावेळी सांगितलं आहे.
Police recruitment : अनेक तरुणांच स्वप्न पोलिसांत भरती होऊन राज्याची आणि देशाची सेवा करण्याचं असतं. अशाच तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आज अधिवेशनादरम्यान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुढील काही दिवसात 7 हजार 231 पदांवर पोलीस भरती करण्यात येणार असल्याची घोषणा केली.
तसंच पोलीस भरती, 2019 मधील रिक्त असलेल्या 5 हजार 297 पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून निवडलेल्या उमेदवारांना लवकरच नेमणुका देण्यात येणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. मंत्रीमंडळाने या भरतीला मान्यता दिली असून कोणताही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल, असेही गृहमंत्र्यांनी सभागृहात सांगितले.
पोलीस ठाण्यांच्या इमारतींचीही होणार सुधारणा
यावेळी पोलीस ठाण्यांच्या जुन्या इमारतींच्या सुधारणा करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. गेल्या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये 87 पोलीस ठाण्यांची बांधकामे हाती घेतली असून यावर्षी पोलीसांच्या निवासस्थानांसाठी देखील भरीव तरतूद केली आहे, असेही गृहमंत्री पाटील यांनी सांगितले. राज्य राखीव पोलीस दलातील अंमलदारांना पोलीस दलात जाण्याची संधी उपलब्ध आहे, त्यासाठी 15 वर्षांची अट होती, ती आता 12 वर्षांवर केल्याचे सांगून कोविडकाळात पोलिसांनी बजावलेल्या कामगिरीचे कौतुक करुन 394 अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी 50 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर केल्याचेही त्यांनी सांगितले.
पोलीसांना बढती देणार
पोलीस सेवेत शिपाई म्हणून रुजू झालेल्या कर्मचाऱ्यास निवृत्त होताना 30 वर्षे सेवा केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षकपदी कालबद्ध पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला असून पोलीस शिपायांना आता निवृत्तीच्या वेळी पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळेल, असेही गृहमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.
हे ही वाचा:
- मुंबई पोलीस आयुक्तांचा 'डिलिव्हरी बॉय'ना इशारा, वाहतूक नियम मोडल्यास होणार 'ही' कारवाई
- वाहने उचलून नेणार नाही! मुंबई पोलीस आयुक्तांचे वाहनधारकांना गोड गिफ्ट, मात्र या अटी लागू
- पोलीस आयुक्तांचं मुंबईकरांना खुलं पत्र, तक्रार करण्यासाठी दिला खासगी मोबाईल नंबर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha