पोलीस आयुक्तांचं मुंबईकरांना खुलं पत्र, तक्रार करण्यासाठी दिला खासगी मोबाईल नंबर
मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai Police Commissioner Sanjay Pandey) यांनी मुंबईकरांना खुलं पत्र लिहिलं आहे. तक्रार असल्यास थेट त्यांच्याशी संपर्क करता यावा म्हणून आपला खासगी मोबाईल नंबरही दिला आहे.
मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai Police Commissioner Sanjay Pandey) यांनी मुंबईकरांना खुलं पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी मुंबईमधील नागरिकांना काही तक्रार असल्यास थेट त्यांच्याशी संपर्क करता यावा म्हणून आपला खासगी मोबाईल नंबर दिला आहे. या पत्रात ते म्हणाले आहेत की, मुंबई शहराशी आणि त्या माध्यमातून आपल्याशी माझे एक भावनिक नाते जुळलेले आहे. गेली जवळपास 30 वर्षे मी या शहरात आणि पोलीस दलात विविध पदांवर काम केले आहे. मुंबई पोलिसांची स्वतःची एक गौरवशाली परंपरा आणि इतिहास आहे. किंबहुना मुंबईच्या पोलिसांची नेहमीच स्कॉटलंडच्या पोलीसांशी तुलना होत आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलाचा आयुक्त या नात्याने मुंबईकर जनतेची सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे. ही बाब माझ्यासाठी गौरवास्पद आणि अभिमानाची असल्याचे ते म्हणाले आहेत.
तक्रार आणि सूचना सांगण्यासाठी दिला खासगी मोबाईल नंबर
मुंबई पोलीस आयुक्तांच्या अधिकृत अकाऊंटवरून हे पत्र ट्वीट करण्यात आलं आहे. ज्यात पोलीस आयुक्त संजय पांडे म्हणाले आहेत की, ''या कठीण काळात आणि एकूणच कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने आपल्यालाही अनेक अडचणी भेडसावत असणार. त्यामुळे मुंबई पोलीस दलाच्या कामकाजात काही सुधारणा होणे आवश्यक वाटत असल्यास व त्याबाबत आपल्या काही सूचना असल्यास मला 9869702747 या क्रमांकावर जरूर कळवा.'' ते म्हणाले आहेत की, अनेकवेळा अगदी छोट्या सूचनाही मोठे बदल घडवून आणू शकतात. त्यामुळे योग्य सूचनांची दखल घेऊन त्यानुसार बदल घडवून आणण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला जाईल.
Good Afternoon Mumbai
— CP Mumbai Police (@CPMumbaiPolice) March 3, 2022
It’s truly an honour to get the opportunity of serving our city as the Commissioner of Police. Your support and cooperation will make the efforts stronger. Let’s keep in touch https://t.co/tMfkcK8Vi9
+919869702747 @sanjayp_1 #MumbaiFirst #AskCPMumbai pic.twitter.com/P688gxUDan
आपल्या पत्रात ते पुढे म्हणाले, ''मुंबई पोलीस दलातील सर्व अधिकारी व अमलदारांच्या साथीने मी मुंबईकर जनतेला आश्वस्त करू इच्छितो, की त्यांच्या मदतीसाठी, संरक्षणासाठी आणि एकूणच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस 24 तास सज्ज आहेत. असं म्हणत त्यांनी मुंबईकरांचे आभार मानले आहेत. दरम्यान, संजय पांडे यांची नुकतीच मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याआधी हेमंत नगराळे हे मुंबईचे पोलीस आयुक्त होते. त्यांची आता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
संबंधित बातमी:
New Mumbai Police Commissioner : मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी संजय पांडे यांची नियुक्ती