Goa Crime : अफेअर लपवण्यासाठी 5 स्टार हॉटेलच्या मॅनेजरने 27 वर्षीय बायकोला समुद्रात बुडवून मारले; अपघात भासवण्याचा आटोकाट प्रयत्न
आरोपीने दिलेल्या माहितीनुसार त्याची पत्नी लखनऊमध्ये राहत होती. तीही त्याच्यासोबत राहायला गोव्यात आली. दीक्षाला तिच्या पतीचे दुसऱ्या कोणाशी तरी अफेअर असल्याचा संशय होता. तिने पतीची चौकशी केली होती.
पणजी (गोवा) : गोव्यातील एका 5-स्टार हॉटेलच्या व्यवस्थापकाने पत्नीला समुद्रात बुडवून मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. सुरुवातीला त्याने पत्नीच्या मृत्यूला अपघात भासवण्याचा प्रयत्न केला, पण नंतर त्याने खुनाची कबुली दिली. गोवा पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (20 जानेवारी) घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी 19 जानेवारी रोजी दुचाकी बुक केली होती. दुपारी 3.35 च्या सुमारास ते पत्नीसह काबो डी रामा बीचवर गेले. तिथे दोघांनी काही वेळ तिथं घालवला. यानंतर ते पाण्यात गेले. यावेळी पतीने पत्नीला समुद्रात बुडवले. 29 वर्षीय गौरव कटियार आणि 27 वर्षीय दीक्षा गंगवार असं या जोडप्याचं नाव आहे. दोघेही लखनौचे रहिवासी आहेत. गौरवने यापूर्वी चेन्नईमध्ये काम केले होते. महिनाभरापूर्वी त्याने गोव्यातील कोलवा येथील कोर्टयार्ड बाय मॅरियटमध्ये काम सुरू केले होते.
बायकोला नवऱ्याच्या अफेअरचा संशय
आरोपीने दिलेल्या माहितीनुसार त्याची पत्नी लखनऊमध्ये राहत होती. तीही त्याच्यासोबत राहायला गोव्यात आली. दीक्षाला तिच्या पतीचे दुसऱ्या कोणाशी तरी अफेअर असल्याचा संशय होता. तिने पतीची चौकशी केली होती. यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते.
पर्यटकांनी उघड केलेला व्हिडिओ
गोव्याच्या कुंकोलिमचे डेप्युटी एसपी संतोष देसाई यांनी सांगितले की, समुद्रकिनाऱ्यावर फोटो आणि व्हिडिओ काढणाऱ्या काही पर्यटकांनी या जोडप्याला पाण्यात जाताना पाहिले होते. मात्र, गौरव एकटाच परत जाताना पाहून त्यांना संशय आला. काही लोकांनी त्याचा व्हिडिओही रेकॉर्ड केला होता. परतत असताना गौरवला त्याची पत्नी सोबत नव्हती.
अपघात असल्याचा भासवण्याचा प्रयत्न
काही वेळाने दीक्षाचा मृतदेह पाण्यात तरंगताना पर्यटकांना दिसला. याबाबत कुंकोलीम पोलिसांना माहिती देण्यात आली. प्रथम गौरवने हा अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र, व्हिडिओबाबत सांगितल्यावर त्याने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली.
गळा दाबून जखमा झाल्याच्या खुणा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीच्या अंगावर गळा दाबून मारल्याच्या आणि इतर जखमा होत्या, त्यावरून हत्येपूर्वी दोघांमध्ये भांडण झाल्याचा अंदाज आहे. पोलिस गौरवच्या कॉल डिटेल्सचीही चौकशी करत आहेत. त्याला शनिवारी स्थानिक न्यायालयात हजर केले असता, तेथून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दीक्षाचे कुटुंबीय गोव्यात पोहोचल्यावर शवविच्छेदन केले जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
महिनाभरात दुसरी हाय प्रोफाईल हत्या
गोव्यात या महिन्यातील हायप्रोफाईल हत्येची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी 7 जानेवारी रोजी बेंगळुरूच्या महिला सीईओ सुचना सेठवर गोव्यातील एका हॉटेलमध्ये आपल्या 4 वर्षांच्या मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. 6 जानेवारी रोजी सुचना आपल्या मुलासह गोव्यात आली. 8 जानेवारी रोजी गोव्याहून बंगळूरला जात असताना सुचनाने कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातून अटक करण्यात आली होती. तिच्या बॅगेत मुलाचा मृतदेह सापडला होता.
इतर महत्वाच्या बातम्या