एक्स्प्लोर
अनिकेत कोथळेवर दोन महिन्यांनी अंत्यसंस्कार, कुटुंबीयांना शोक अनावर
पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळेच्या मृतदेहाचे अवशेष त्याच्या कुटुंबीयांनी सीआयडी कार्यालयातून आज ताब्यात घेतले.
सांगली : पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळेच्या मृतदेहाचे अवशेष त्याच्या कुटुंबीयांनी सीआयडी कार्यालयातून आज ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्या अवशेषांवर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. सांगली पोलिसांच्या मारहाणीत 6 नोव्हेंबर 2017 ला अनिकेतचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आंबोली घाटात त्याचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न पोलिसांकडून झाल्याचं समोर आलं.
या प्रकरणात पोलीस खात्यासह गृहविभागाची मोठी बेअब्रू झाली. अनिकेतच्या हत्येप्रकरणी युवराज कामटेसह आतापर्यंत एकूण 12 पोलिसांना निलंबित केलं गेलं, तर पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे आणि उपअधीक्षक दिपाली काळे यांची बदली करण्यात आली होती.
मुलावर मृत्यू झाल्यानंतर दोन महिन्यांनी अंत्यसंस्कार करायला मिळाल्यानंतर कुटुंबीयांचा शोक अनावर झाला. खरं तर हा आक्रोश दाखवून तुम्हाला अस्वस्थ करण्याचा आमचा उद्देश नाही. पण अनिकेतसोबत पोलीस खात्यातल्या काही जुलमी प्रवृत्तींनी किती क्रूरकृत्य केलंय आणि गेल्या दोन महिन्यांपासून अनिकेतचं कुटुंब किती यातना भोगतंय, हे दाखवण्यासाठी हा आक्रोश गरजेचा आहे. किमान हा आक्रोश पाहून तरी व्यवस्था या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील.
हा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा आहे. आपल्या लाडक्या मुलाचे तुकडे तुकडे झालेले पाहून जे प्रत्येक आईचं होईल... तेच अनिकेतच्या आईचं झालं. आपल्या सौभाग्याचं लेणं 5 वेगवेगळ्या खोक्यांमध्ये असल्याचं पाहून एखाद्या पत्नीचं जे होईल, तेच अनिकेतच्या पत्नीचं झालं.
गेल्या दोन महिन्यांपासून शासकीय रुग्णालयाच्या शीतपेटीमध्ये छिन्नविच्छिन्न झालेल्या मृतदेहाला आता कोथळे कुटुंबीयांनी ताब्यात घेतलं. त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. पण अनिकेतच्या चितेची आग कुटुंबीयांच्या मनामध्ये अजूनही धगधगत आहे.
4 नोव्हेंबरला दुकानमालकासोबत अनिकेतचं भांडण होतं.. 6 नोव्हेंबरला त्याला चोरीच्या आरोपाखाली अटक होते.. 7 नोव्हेंबरला थर्ड डिग्रीच्या मारहाणीत अनिकेतचा मृत्यू होतो.. 8 नोव्हेंबरला मृतेदेहासह युवराज कामटे आणि साथीदार आंबोलीला जातात.. 8 नोव्हेंबर रोजीच त्याच्या मृतदेहाला आंबोलीत जाळलं जातं आणि 11 नोव्हेंबरला अनिकेतच्या भावामुळे भांडं फुटतं..
पण 11 नोव्हेंबर ते 11 जानेवारी... या दोन महिन्यातल्या यातनांचं काय? गेल्या दोन महिन्यांपासून अनिकेतच्या कुटुंबीयांनी संयमाचा आदर्श घालून दिला आहे. आता व्यवस्थेनेही त्यांच्या या संयमाची परीक्षा पाहू नये... इतकीच अपेक्षा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement