सासू-सुनेच्या नात्यातील प्रेम! सोलापुरात सासूच्या पार्थिवाला सुनांकडून खांदा
बार्शी (Barshi) तालुक्यातील मळेगावातील (Malegaon) दमयंती मुंढे या जलयुक्त शिवार अभियानातून आपल्या गावाची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या तत्कालीन सरपंच गुणवंत मुंढे यांच्या मातोश्री होत्या.

सोलापूर : सासू सुनेचं नातं म्हटलं की एक द्वेशाचं नातं असंच चित्र समोर येतं किंवा तसंच ते अनेक चित्रपटांमध्ये मालिकांमध्ये रंगवलं जातं. अनेक ठिकाणी सासू सुनांचं एका घरात अजिबात पटत नाही. मात्र सासू-सुनेच्या नात्यातील प्रेम दर्शवणारी घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत घडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील मळेगाव येथील दमयंती मुंढे यांचे बुधवारी (4 ऑगस्ट रोजी) वयाच्या 70 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. यावेळी परंपरेला छेद देत सासुबाईंच्या पार्थिवाला दमयंती मुंडे यांच्या चार सुनांनी खांदा दिला.
मयत दमयंती मुंडे यांनी चारही सुना अनिता यशवंत मुंढे, वैशाली जयवंत मुंढे, अर्चना गुणवंत मुंढे आणि मनोरमा बळवंत मुंढे यांना कायम मुलींप्रमाणे प्रेम अन् माया दिली. या सुनांनीही कधी सासूबाईंचा शब्द खाली पडू दिला नाही की, शब्दाने कधी दुखावले नाही. वृद्धापकाळाकडे झुकलेल्या दमयंती यांची सेवा-शुश्रुषा देखील या सुनांनी अंत्यत काळजीने केली. त्यांचे नाते म्हणजे सासू-सून नाही तर, आई-मुलीप्रमाणेच फुलत गेले आणि शेवटपर्यंत टिकलेही.

दमयंती मुंडे यांच्या जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला. दुपारी अंत्यविधी निघाली त्यावेळी प्रेताला खांदा देण्यासाठी सुना पुढे आल्या. दमयंती यांचे भाऊ चंद्रकांत, हरिश्चंद्र आणि संभाजी तर मुले यशवंत, जयवंत, गुणवंत, बळवंत यांनी देखील खांदा दिला. दमयंती यांचे पती कारभारी मुंडे हे स्वतः शिक्षक होते. त्यामुळे त्यांनी या बदलास संमती दिली.
स्वतः दमयंती या 1990 ते 95 ह्या काळात पंचायत समितीच्या सदस्य म्हणून कार्यरत होत्या. याशिवाय संपूर्ण राज्यामध्ये जलयुक्त शिवार अभियानातून आपल्या गावाची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या तत्कालीन सरपंच गुणवंत मुंढे यांच्या त्या मातोश्री होत्या.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























