कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद मिटवण्यासाठी मराठी बांधव पंतप्रधान मोदींना पाठवणार 11 हजार पत्रं
कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद मिटवण्यासाठी मराठी बांधव पंतप्रधान नेरंद्र मोदी यांना 11 हजार पत्रं नऊ ऑगस्टला क्रांती दिनी पाठवणार आहे. युवा समिती यासाठी गावागावात जाऊन जनजागृती करत आहे.
बेळगाव : कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नऊ ऑगस्टला क्रांती दिनी 11 हजार पत्रे पाठवण्यात येणार आहेत. पत्रे पाठवण्याच्या मोहिमेला सीमाभागातील मराठी भाषिकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्न दीर्घकाळ प्रलंबित असून त्याकडे लक्ष वेधण्यासाठी म्हणून युवा समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 11 हजार पत्रे पाठवण्याची मोहीम हाती घेतली आहे. सीमाभागातील मराठी जनतेने पत्र लिहून ही मोहीम यशस्वी करावी यासाठी गावोगावी जागृती सभा घेण्यात येत आहे. खानापूर तालुक्यात जनजागृती करण्याबरोबरच बेळगाव, निपाणी येथेही सभा घेण्यात आल्या आहेत. या उपक्रमाची देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नक्कीच दखल घेतील आणि सीमाभागातील मराठी भाषिक जनतेवर होत असलेला अन्याय दूर करतील असा विश्वास गावोगावी घेण्यात येत असलेल्या जनजागृती सभेत मराठी भाषिक व्यक्त करत आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीने देखील बैठक घेवून युवा समितीने हाती घेतलेल्या मोहिमेचे कौतुक केले आहे. मराठी भाषिकांनी नऊ ऑगस्ट रोजी पंतप्रधानांना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त कराव्यात असे आवाहन केले आहे.
दोन्ही सरकार वाद सोडवण्यात अपयशी
आतापर्यंत महाराष्ट्र आणि कर्नाकट राज्यात अनेक सरकार आली आणि गेली. मात्र, हा सीमावाद कोणालाही सोडवता आलेला नाही. या हा वाद सोडवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली होती. मात्र, तरीही यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. दुसरीकडे या प्रांतातील 40 लाख मराठी माणसांवर कर्नाटक सरकार वारंवार अन्यायकारक गोष्टी करत आहे. त्यामुळे आता येथील मराठी बांधवांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच साकडे घालवण्याचे ठरवले आहे.
कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद
कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद दोन्ही सरकारचं कित्येक दिवसांपासूनचं दुखणं आहे. गेल्या कित्येक वर्षांत अनेकांना या वादात आपला जीव गमवावा लागला आहे. काही महिन्यापूर्वीच बेळगाव सीमावाद पुन्हा चिघळला होता. कर्नाटकमधील व्यक्तीकडून महाराष्ट्र एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात ही घटना घडली. त्यानंतर दोन्ही राज्याकडून एसटीची वाहतूक बंद करण्यात आली होती.
बेळगावमध्ये कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या कारवर हल्ला केल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातील वाद पुन्हा चिघळला होता. बेळगावात कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुखाच्या गाडीवर हल्ला केला आणि गाडीवरील झेंडा काढून कारची तोडफोड केली. त्यानंतर कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक झाले. शिवसैनिकांनी कोल्हापूर बस स्थानकावर आंदोलन करत कर्नाटक राज्याची बससेवा बंद केली. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत कन्नड संघटनेच्या आंदोलनाला प्रत्युत्तर दिलं.