माणुसकीला सलाम...! कोरोनाबाधित हिंदू व्यक्तीवर मुस्लिम बांधवांकडून अंत्यसंस्कार
घरच्यांनी मृतदेह नाकारल्यानंतर कोरोनाबाधित हिंदू वृद्धावर मुस्लिम बांधवांकडून अंत्यसंस्कार. अकोल्यातील 'कच्छी-मेमन जमात ट्रस्ट'ने घालून दिला आदर्श.
अकोला : 'घर से मस्जिद है बहूत दूर, कही यू करले... किसी रोते हूए बच्चे को हँसाया जाये'... काही वर्षांपुर्वी आलेल्या 'तमन्ना' या हिंदी चित्रपटातलं हे एक सुंदर गीत. गीतकार आणि शायर निदा फाजली यांचं हे गीत प्रत्येक धर्मग्रथांचं 'सार' अन 'सरनामा'चं म्हणायला हवं. अकोल्यात ईदच्या पुर्वसंध्येला घडलेला एक प्रसंग माणुसकी आणि मानवतेच्या कक्षा रूंदावून, दृढ आणि समृद्ध करून गेला. एकीकडे ईदची लगबग सुरू असतांना अकोल्यातील काही मुस्लिम युवकांनी माणुसकीच खरी 'इबादत' आणि 'इमान' मानवसेवी असल्याचा वस्तूपाठ समाजासमोर घालून दिला.
अकोल्यातील श्रावगी प्लॉट भागातील एका हिंदू वृद्ध व्यक्तीचा 23 मे रोजी जिल्हा रूग्णालयात कोरोनावरील उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर रूग्णालय आणि महापालिका प्रशासनानं त्यांचे कुटूंबिय आणि आप्तेष्टांशी मृतदेह घेऊन जाण्यासंदर्भात संपर्क साधला. मात्र, मृत्यूच्या चोवीस तासानंतरही त्यांचा मृतदेह स्वीकारायला घरातलं कुणीच समोर आलं नाही. यामूळे प्रशासन मोठ्या चिंतेत सापडलं होतं.
याचवेळी प्रशासनाच्या आणि मानवतेच्या मदतीसाठी धावून आलेत अकोल्यातील 'कच्छी-मेमन जमात ट्रस्ट'चे मुस्लीम तरुण. या तरूणांनी या मृतदेहावर विधीवत अंत्यसंस्कारांची तयारी दाखवली. शहरातील मोहता मील स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. 'कच्छी-मेमन जमात ट्रस्ट'चे जावेद झकारिया, तनवीर खान, अज़ीज़ खान, शेख इरफान, बाबा भाई, जावेद खान शाबाज़ खान, वसीम भाई, समीर भाई यांनी अंत्यसंस्काराची संपुर्ण जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. महापालिकेचे स्वछता अधिकारी प्रशांत राजुरकर हे कामात या तरूणांसोबत होते. सरणावर लाकडी रचली गेली. अंत्यसंस्काराचे विधीही पार पडले. पण सर्वात शेवटचा विधी होता चितेला अग्नी देण्याचा... वृद्ध मृत व्यक्तीच्या पार्थिवाला अग्नी वसीम खान आणि समीर खान या मुस्लिम तरूणांनी दिला. आगीच्या ज्वाळा उठताच सदर मृत व्यक्ती अनंतात विलीन झाली.
जिथे स्वत:च्या रक्ताच्या नात्यांनी नाकारलं, तिथे माणुसकीनं त्यांचा अंतिम प्रवास सुकर केली. ही व्यक्ती जरी मरण पावली, मात्र माणुसकीनं परत नव्यानं जन्म घेतला होता. रमजानच्या समारोपाला यासारखी 'इबादत' दुसरं असावी तरी काय?. या तरूणांच्या एका पावलानं त्यांच्यासाठी रमजान खऱ्या अर्थाने पावन झाला असंच म्हणावं लागेल.
1959 मध्ये 'धुल का फुल' चित्रपटात साहिर लुधियानवी यांचं एक गीत होतं. या गीतातच या व्यक्तीच्या अंतिम प्रवासाचं सार लपलं होतं. अन त्यानिमित्तानं झालेल्या माणुसकी धर्माचीही बीजं याच गीतात लपली होती.
मैं मुस्लिम हूँ, तू हिन्दू है, हैं दोनों इंसान,
ला मैं तेरी गीता पढ़ लूँ, तू पढ ले कुरान,
अपने तो दिल में है दोस्त, बस एक ही अरमान,
एक थाली में खाना खाये सारा हिन्दुस्तान।
तू ना हिन्दु बनेगा, ना मुसलमान बनेगा
इन्सान की औलाद है, इन्सान बनेगा
अकोल्यातील कच्छी-मेमन जमात ही मुस्लिम संघटना सदैव राष्ट्रीय आणि सामाजिक एकात्मतेसाठी काम करीत आहे. कोरोना संकटात अकोल्यात प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावत कोरोनाबाधित रूग्णांवर अंत्यसंस्कार, त्यांच्या आरोग्यासाठी ही संघटना झटत आहे. कोरोनाच्या संकटात आतापर्यंत या सेवाभावी तरूणांनी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असलेल्या वीसपेक्षा अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केलेत.
अलिकडे समाजात, जाती-जातीत फुट पाडणाऱ्या प्रवृत्तींचे मोठं पिक देशात वाढतं. कोरोनासारख्या संकटातही हे विष वेगानं समाजात पसरविण्याचे प्रयत्न होत आहेत. सध्याच्या विद्वेष आणि नकारात्मकतेच्या वाळवंटात अकोल्यातील ही घटना माणुसकीची हिरवळ फुलविणारी म्हणावी लागेल.