(Source: ECI/ABP News/ABP Majha)
फडणवीसांनी खडसेंचा राजकीय बळी घेतला; नारायण राणेंचं जुनं ट्विट व्हायरल
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अशातचं भाजप खासदार नारायण राणे यांचे एक जुनं ट्विट पुन्हा व्हायरल होत आहे.
मुंबई : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपला सोडचिठ्ठी देत हातात राष्ट्रवादीचे घड्याळ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. खडसे यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अशातचं भाजप खासदार नारायण राणे यांचे एक जुनं ट्विट पुन्हा व्हायरल होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांचा राजकीय बळी घेतला, असं राणेंनी जुन्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
काय आहे नाराणय राणे यांचं ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांचा राजकीय बळी घेतला असून भाजपमध्ये बहुजन नेतृत्वाला टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एका बाजूला एकनाथ खडसेंना क्लीनचीट दिल्याचे मुख्यमंत्री सांगतात, दुसऱ्या बाजूला दिल्लीत जाऊन खडसेंचा राजीनामा घ्यायची विनंती करतात. या सरकारमध्ये बहुजन समाजाच्या नेत्यांना आतापर्यंत टार्गेट करण्यात आले आहे, असे दिसून येते, असे ते ट्वीट आहे. 4 जून 2016 साली हे ट्विट करण्यात आले आहे. खडसे यांच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर ते व्हायरल होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांचा राजकीय बळी घेतला असून #BJP मध्ये बहुजन नेतृत्वाला टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
— Narayan Rane (@MeNarayanRane) June 4, 2016
Eknath Khadse | नाथाभाऊंनी मला व्हिलन ठरवलंय, योग्य वेळी बोलेन : देवेंद्र फडणवीस
'जीवन उद्ध्वस्त करण्याचा फडणवीसांकडून प्रयत्न' : एकनाथ खडसे
राजीनामा दिल्यानंतर खडसे भावूक होत म्हणाले की, भाजप सरकारमध्ये माझ्या राजीनाम्याची मागणी कुणीही केली नव्हती. माझ्या चौकशीची कुणीही मागणी केली नव्हती. कुणीही राजीनामा मागितला नसताना मला राजीनामा द्यायला लावला. माझी तक्रार देवेंद्रजींवर आहे. माझ्यावर त्यांनी विनयभंगाचा खटला दाखल करायला लावला. हे मरणाहून मेल्यासारखं आहे. माझ्यासोबत अत्यंत खालच्या स्तराचं राजकारण केलं. माझ्या कुटुंबाला यामुळं मनस्ताप झाला. माझ्यावर पाळत ठेवली गेली. मंत्री असताना नऊ महिने पाळत ठेवली. मला काही मिळालं किंवा नाही मिळालं याचं दुख नाही, मी माझ्या ताकतीनं ते मिळवलं, असं ते म्हणाले.
नाथाभाऊंनी मला व्हिलन ठरवलंय : देवेंद्र फडणवीस
नाथाभाऊंनी राजीनामा द्यायला नको होता, हे अतिशय दुर्दैवी आहे. कोणाला तरी व्हिलन ठरवायचं असतं, त्यांनी मला व्हिलन ठरवलंय, असे म्हणत मला यावर कुठलीच प्रतिक्रिया द्यायची नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. मी योग्य वेळी बोलेन. मी त्यांच्यावर कुठल्याही खोट्या केसेस केल्या नाहीत. त्या केसेसच्या तपशिलात गेला तर तुम्हाला लक्षात येईल, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.
Devendra Fadnavis | नाथाभाऊंनी मला व्हिलन ठरवलंय, योग्य वेळी बोलेन : देवेंद्र फडणवीस