![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सॅनिटायजरचा भडका; नाशिकमध्ये विवाहीत महिलेचा मृत्यू
सॅनिटायजरची हाताळणी करतांना योग्य ती खबरदारी न घेतल्याने एका विवाहीत महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये समोर आली आहे.
![सॅनिटायजरचा भडका; नाशिकमध्ये विवाहीत महिलेचा मृत्यू Eruption of sanitizer Married woman dies in Nashik सॅनिटायजरचा भडका; नाशिकमध्ये विवाहीत महिलेचा मृत्यू](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/03/01035337/Sanitizer.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सॅनिटायजरचा वापर सध्या मोठ्या प्रमाणावर केला जातोय मात्र याच सॅनिटायजरची हाताळणी योग्यरित्या न केल्याने एका विवाहीत महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये समोर आली आहे.
कोरोनावर खबरदारीचा उपाय म्हणून सध्या प्रत्येक घरा घरात जाऊन पोहोचलेली एक वस्तू म्हणजे सॅनिटायजर मात्र या सॅनिटायजरचा अतिवापर हा घातक ठरू शकतो हे सरकारकडून नुकतेच जाहीर करण्यात आले. असे असतानाच दुसरीकडे याचं सॅनिटायजरची हाताळणी करतांना योग्य ती खबरदारी न घेतल्याने शहरातील कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या वडाळागावातील मेहबूब नगरमध्ये राहणाऱ्या रजबीया शेख या 24 वर्षीय विवाहित महिलेचा मृत्यू झाला आहे. पती शाहिद, सहा वर्षीय मुलगी मेहजबीन आणि तिन वर्षाची चिमुकली अक्सा यांच्यासोबत रजबीया येथे वास्तव्यास होत्या. 20 जुलैला रात्रीच्या सुमारास घरातील वीजपुरवठा खंडित झाल्याने त्यांनी मेणबत्ती पेटवली होती. वडाळागावात गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने होत असून या पार्श्वभूमीवर रात्री 11 च्या सुमारास घरात सॅनिटायजरची त्या फवारणी करत होत्या आणि याचवेळी सॅनिटायर मेणबत्तीच्या संपर्कात आल्याने अचानक भडका उडाला, या घटनेत रजबीया गंभीररित्या भाजल्या तसेच त्यांचे पतीही जखमी झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने उपचारासाठी तातडीने नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं मात्र 90 टक्के भाजल्याने चार दिवसानानंतर रजबीया यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि 24 जुलैला रात्री त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले तर पतीवर सध्या उपचार सुरु आहेत.
शेख कुटुंबाची घरची परिस्थिती तशी हलाखीची.. त्यांचे पती खोदकाम तसेच मोलमजूरीची कामे करतात. तर रजबीया या देखील घरकाम करत आपला उदरनिर्वाह करायच्या, त्यांच्या अशा अचानक जाण्याने वडाळा गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. इंदिरानगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून रजबीया यांच्या मृत्यूमागे इतर कुठलेही कारण नसून सॅनिटायरची योग्य रित्या हाताळणी न केल्याने झालेली ही दुर्घटनाच असल्याचं पोलिस निरीक्षक निलेश माईनकर यांनी स्पष्ट करत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
सॅनिटायजरच्या अतिवापर केल्याने हात लाल होणे, कोरडेपणा येणे अशाप्रकारचे अनेक साईड इफेक्ट्स आतापर्यंत समोर आले आहेत. सॅनिटायजरमध्ये अल्कोहोल असल्याने तो एक ज्वलनशील पदार्थ असून त्याचा वापर करतांना हलगर्जीपणा केल्यास किंवा गैरवापर केल्यास तो नक्कीच धोकेदायक ठरू शकतो. त्यामुळे सॅनिटायजर हाताळताना योग्य ती काळजी घ्या आणि शक्यतो डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्याचा वापर केल्यास नक्कीच ते उत्तम ठरू शकेल.
संबंधित बातम्या :
-
हँड सॅनिटायझरचा अतिवापर धोकादायक, आरोग्य विभागचा इशारा
नागपुरात सॅनिटायझर प्यायल्याने एका व्यक्तीचा मृत्यू
दुचाकी सॅनिटाईज करताना जळून खाक होऊ शकते? काय काळजी घ्याल?
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रिक्षामध्ये वॉश बेसिन, हॅंड सॅनिटाझरची सुविधा, मुंबईतल्या सत्यवान गीतेंची कल्पना!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)