दुचाकी सॅनिटाईज करताना जळून खाक होऊ शकते? काय काळजी घ्याल?
सॅनिटाईज करताना वॉटर बेस सॅनिटायझर म्हणजेच सोडियम हायपोक्लोराईट वापरावे लागेल. पाण्यात सोडियम हायपोक्लोराइटचे 0.2 ते 0.5 इतकेच प्रमाण घेऊन दुचाकी सॅनिटायज करायला हवी.
पिंपरी चिंचवड : सॅनिटायझरचा अतिवापर त्वचेला बाधा पोहचवतो. हाच सॅनिटायझर कारमध्ये बाळगला आणि कार उन्हात पार्क केली तर कारचा स्फोट होऊ शकतो. या बातम्या 'एबीपी माझा'ने दाखवून तुम्हाला सतर्कही केलंय. अशातच ठिकठिकाणी सॅनिटाईज केल्या जाणाऱ्या दुचाकी धोक्यात असल्याचं समोर आलंय. सॅनिटाईज करताना ज्वलनशील पदार्थाचा वापर केल्यास दुचाकी जळून खाक होतेय. दुचाकीस्वार आणि सॅनिटायज करणाऱ्यांचा जीवही यामुळे जाऊ शकतो. यावर एबीपी माझाने जाणकारांशी बोलून काही पर्यायही शोधलेत.
दुचाकी सॅनिटाईज करताना, ज्वलनशील पदार्थ सायलेन्सरवर पडल्याने एका गाडीने अचानक पेट घेतला. दुचाकीस्वाराने गाडी सोडून पळ काढल्याने अन् सॅनिटाईज करणाऱ्यांनी हातातील मशीन दूर फेकल्याने सुदैवाने ते बचावले. नंतर फायर सेफ्टी किटने आगीवर तातडीने नियंत्रण मिळवण्यात आलं. असा काही सेकंदांचा समाज माध्यमांवर व्हायरल झालेला व्हिडीओ अनेकांच्या मोबाईलमध्ये येऊन पोहचलाही असेल. दुचाकी, दुचाकीस्वार आणि सॅनिटाईज करणाऱ्या व्यक्तींचा जीव वाचणं असा योग प्रत्येकवेळी जुळून येणार नाही. त्यामुळेच हा धक्कादायक व्हिडीओ पाहून अनेक जण चिंता व्यक्त करतायेत. कदाचित हा कोरोना दुचाकीसोबत घरात अथवा कंपनीत प्रवेशही करतो? मग आता दुचाकी सॅनिटाईज कशी करायची? हा धोका टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यायची असे अनेक प्रश्न हा व्हिडीओ पाहणाऱ्यांच्या मनात उभे आहेत.
मुळात ही घटना का घडली?
दुचाकीने अवघ्या 15 किलोमीटरचा प्रवास केला तरी त्याचं सायलेन्सरचे तापमान 100 डिग्रीच्या वर जातं. अशात आपल्या शरीराचा कोणताही भाग सायलेन्सरला चिकटला तर त्वचा जळते. मग अशावेळी दुचाकी सुरु असताना ज्वलनशील (अल्कोहोलयुक्त) पदार्थ सायलेन्सरवर पडल्यास गाडी पेट घेणारच. अशी माहिती गेली 22 वर्ष दुचाकी दुरुस्त करणारे पिंपरी चिंचवडचे फिटर चैतन्य काची यांनी दिली.
दुचाकी कशी सॅनिटाईज करावी?
सॅनिटाईज करताना अशी घटना पुन्हा घडू द्यायची नसेल तर तुम्हाला वॉटर बेस सॅनिटायझर म्हणजेच सोडियम हायपोक्लोराईट वापरावे लागेल. पाण्यात सोडियम हायपोक्लोराइटचे 0.2 ते 0.5 इतकेच प्रमाण घेऊन दुचाकी सॅनिटायज करायला हवी. अथवा सोफ सोल्युशनने गाडी स्वच्छ धुवून घेतली तरी गाडी सॅनिटाईज होऊ शकते. हे दोन पर्याय दुचाकी सॅनिटाईज करण्यासाठी सुरक्षित असल्याने याचा अवलंब करता येईल, असा सल्ला तज्ज्ञ डॉ. किरण जाधव यांनी दिला.
चारचाकीत सॅनिटायझर बाळगल्याने गाडीत स्फोट होऊ शकते. आता दुचाकी सॅनिटाईज करताना ती जळून खाक होऊ शकते. अशा बातम्या देऊन आम्ही कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करत नाहीये. तर कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून एबीपी माझा यातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करतेय.