Eknath Shinde : राज्यातील पेट्रोल-डिझेलचे दर लवकरच कमी करणार, जनतेला दिलासा देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
Maharashtra Political Crisis : काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरचा कर कमी केला होता, आता राज्याचाही कर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई: राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवरचा कर लवकरच कमी करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरचा कर कमी केला, तशाच प्रकारचा निर्णय आता राज्यातही घेतला जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यावेळी समारोपाच्या भाषणावेळी त्यांनी तीन मोठ्या घोषणा केल्या. त्यांनी हिरकणी गाव वाचवण्याकरता 21 कोटींचा निधी मंजूर केला. शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र आम्ही करणार असंही ते म्हणाले. तसेच पेट्रोल-डिजेलवरील वॅट कमी करण्याचा निर्णय नवं सरकार कॅबिनेटमध्ये लवकरच करेल अशीही महत्त्वाची घोषणा त्यांनी केली.
एकनाथ शिंदे म्हणाले की, "काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी केली. त्याच धरतीवर आता राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्यात येईल. त्यामुळे त्याचा फायदा हा राज्यातील जनतेला होणार आहे. येत्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेण्यात येईल."
राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी इंधनावरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 4, 2022
मे महिन्यात केंद्र सरकारनं इंधनाच्या किमतीतून उत्पादन शुल्क कमी केलं होतं. त्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले. मे महिन्यात म्हणजेच, 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत बदल झाला होता. तेव्हापासून देशातील पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयानंतर आता राज्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती या कमी होतील. शिंदे सरकारच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय होणार आहे.
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांतील दर काय?
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत इंधन दर स्थिर आहे. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोलचा दर 111.35 रुपये तर डिझेलचा दर 97.28 रुपये प्रतिलिटर आहे. आज पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 110.88 रुपये तर डिझेलचा दर 95.37 रुपये प्रति लिटर आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 111.74 रुपये तर डिझेलचा दर 96.20 रुपये प्रति लिटर आहे. नागपुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.08 रुपये तर डिझेलचा दर 95.59 रुपये प्रति लिटर आहे. कोल्हापुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.34 रुपये तर डिझेलचा दर 95.84 रुपये प्रति लिटर आहे.