Success Story: पत्ताकोबीतून 54 लाखांचं उत्पन्न! सोलापूरच्या शेतकऱ्यानं 8 एकरात घेतलं उत्पादन, अडीच महिन्यात..
success story: वीस रुपये किलोच्या दराने, त्यांना 54 लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे.
Agriculture Success Story: राज्यातील शेतकरी कमीत कमी खर्चात अधिक कमाई करणााऱ्या पिकांकडे वळताना दिसतोय. सोयबीन, ऊस, या पिकांसोबत भाजीपाला, फळपिकांतून कमाई करण्याकडे शेतकऱ्यांचा ओढा दिसत आहे. सोलापूरच्या एका शेतकऱ्यानं 8 एकरावर पत्ताकोबीची लागवड करत लाखोंची कमाई केली आहे. या शेतकऱ्याला पत्ताकोबीतून 54 लाखा रुपयांचं उत्पन्न निघेल असा अंदाज आहे. लागवडीत केलेलं चोख व्यवस्थापन, बाजारपेठेचा अंदाज घेऊन नियोजन केल्यास भाजीपाला पिकांमधूनसुद्धा चांगला नफा मिळू शकतो हे यातून समोर येतंय.
सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील घोडेश्वर गावातील अस्लम चौधरी या उच्चशिक्षित शेतकऱ्यानं तब्बल आठ एकरात पत्ताकोबीचं उत्पादन घेतलं आहे. सध्या या शेतकऱ्याच्या शेतात पत्ताकोबीची काढणी सुरु आहे. जर आता जसा भाव आहे, तोच भाव सुरु राहिला तर अडिच महिन्याच्या पिकातून या शेतकऱ्याला 54 लाखांचं उत्पन्न मिळेल अशी आशा आहे. सध्या या शेतकऱ्याच्या उत्पादन आणि नफ्याची सगळीकडे एकच चर्चा आहे.
आठ एकरातून 270 टन पत्ताकोबी
अस्लम चौधरी यांनी अडीच महिन्यांपूर्वी 8 एकरात पत्ताकोबीची लागवड केली. योग्य व्यवस्थापन, तणनियंत्रण आणि कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून उत्कृष्ट उत्पादन मिळवले आहे. सध्या त्यांच्या शेतातून मिळणारा पत्ताकोबीचा गड्डा साधारणपणे दीड किलो वजनाचा आहे. यानुसार, आठ एकरांतून 270 टन उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. वीस रुपये किलोच्या दराने, त्यांना 54 लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. अस्लम चौधरी यांचे यश हे त्याच्या मेहनत आणि शेतीतील तंत्रज्ञानाच्या योग्य वापराचे उदाहरण आहे. त्यांच्या यशस्वी शेतीच्या प्रयोगामुळे इतर शेतकऱ्यांसाठी एक आदर्श निर्माण झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील घोडेश्वर गावचे शेतकरी अस्लम चौधरी यांनी आपल्या प्रयोगशीलतेचा वापर करून 8 एकरात पत्ताकोबीची लागवड केली आहे. बीएससी पदवीधर असलेले अस्लम चौधरी नोकरीच्या मागे न लागता शेतीमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी केळी आणि द्राक्षासारखी बागायती पिके घेतली असून प्रयोगातून प्रगती साधता येते हे या शेतकऱ्याच्या लक्षात आले आहे.
किती खर्च आला?
सोलापूरच्या या शेतकऱ्याने 8 एकर क्षेत्रात एक लाख 80 हजार रोपांची लागवड केली, ज्यासाठी प्रति रोप 60 पैशांचा खर्च आला. त्यामुळे एकरी 45 हजार रुपये आणि आठ एकरांसाठी एकूण 3 लाख 60 हजार रुपये उत्पादन खर्च झाला.अस्लम चौधरी यांनी पत्ताकोबीच्या पिकाच्या व्यवस्थापनासाठी योग्य पद्धतींचा वापर केला, ज्यामुळे त्यांना उत्कृष्ट उत्पादन मिळाले. शेतातील तण आणि कीड नियंत्रणावर केलेली मेहनत आणि योग्य उपाययोजना यामुळे पिकावर कोणताही इतर संकटाचा प्रभाव पडला नाही.