महायुतीत खातेवाटप नेमकं कधी होणार? भरत गोगावलेंनी स्पष्टच सांगितलं, रायगडच्या पालकमंत्रीपदावरही महत्त्वाचं भाष्य; म्हणाले...
Bharat Gogawale : मंत्रिमंडळाच्या शपथविधीला एक आठवडा उलटला तरी अद्याप खातेवाटप झालेले नाही. याबाबत भरत गोगावले यांनी मोठं वक्तव्य केलंय.
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा शपथविधी सोहळा रविवारी (दि. 15) पार पडला. मंत्रिमंडळाच्या शपथविधीला एक आठवडा उलटला तरी अद्याप खातेवाटप झालेले नाही. एकीकडे हिवाळी अधिवेशन संपत आले असून खातेवाटप नेमके अडले कुठे? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. आज हिवाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस असून देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी निवासस्थानी चहापानासाठी विधानसभा आणि विधानपरिषदेतील आमदारांना निमंत्रण देण्यात आले. त्यामुळे मंत्रिमंडळाचे खातेवाटप आजच जाहीर होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यातच आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलंय.
नेमकं काय म्हणाले भरत गोगावले?
भरत गोगावले म्हणाले की, तिन्ही पक्षाची हरकत नाही. तिन्ही नेत्यांनी बसून ठरवलं आहे. आत्ताच आम्ही मुख्यमंत्र्यांकडून चहापानी नाश्ता करुन आलेलो आहोत. आज खाटेवाटप जाहीर होईल, असं वाटत आहे, त्यामुळे आता महायुतीचे खातेवाटप आज जाहीर होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तिन्ही नेते ठरवतील ते आम्हाला मान्य आहे. पालकमंत्री कोण होतील, याबाबतचा निर्णय वरिष्ठ ठरवतील. पण रायगडचे पालकमंत्रीपद आमच्या नशिबात असावं, असं वाटतंय. कुठला विभाग मिळणार हे आत्ताच सांगत नाही, दुपारनंतर समजेल, असेही भरत गोगावले यांनी म्हटले आहे.
अजित पवार आणि धनंजय मुंडेंचा एकच गाडीतून प्रवास
दरम्यान, बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर आरोप होत आहे. यावरून विरोधकांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. वाल्मिक कराड यांच्यावर आरोप झाल्यानंतर मागील चार ते पाच दिवसांपासून धनंजय मुंडे माध्यमांपासून दूर होते. काल रात्री उशिरा धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. या सर्व प्रकरणात दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार आहे, असे त्यांनी म्हटले. वाल्मिक कराड प्रकरणामुळे धनंजय मुंडे अडचणीत येणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र, आज सकाळी धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला विजयगड या निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर अजित पवारांच्या गाडीतून धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी रवाना झाले. त्यामुळे आता धनंजय मुंडे पुन्हा एकदा सक्रीय झाले असल्याचे दिसून येत आहे.
आणखी वाचा