Sharad Pawar: शरद पवार मस्साजोगच्या गावकऱ्यांना म्हणाले, दहशतीमधून बाहेर पडा, या सगळ्याला मिळून तोंड देऊ
Sharad Pawar in Beed: शरद पवार यांनी बजरंग सोनावणे आणि निलेश लंके यांना सोबत घेत मस्साजोग गावात जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
बीड: मस्साजोग गावात सध्या प्रचंड दहशतीचे वातावरण आहे. कृपा करुन या दहशतीमधून बाहेर पडला. या सगळ्याला आपण मिळून तोंड देऊ. एकदा सगळ्यांनी सामूहिक प्रयत्नांची भूमिका घेतल्यावर आपल्याला कोणी अडवू शकत नाही. केंद्र सरकार, राज्य सरकार, बीडचे लोकप्रतिनिधी, वकील मंडळी आणि जिल्ह्यातील व राज्यातील लोक तुमचे हितचिंतक म्हणून गावकरी आणि देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी आहेत, अशा शब्दांत शरद पवार यांनी मस्साजोगच्या गावकऱ्यांना धीर दिला. त्यांनी शनिवारी खासदार बजरंग सोनावणे, निलेश लंके,राजेश टोपे आणि संदीप क्षीरसागर यांच्यासह मस्साजोग गावात जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यानंतर शरद पवार यांनी गावकऱ्यांशी आणि प्रसारमाध्यमांशी जाहीरपणे संवाद साधला.
यावेळी शरद पवार यांनी मस्साजोग गावातील जनतेला धीर देत संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा खोलात जाऊन तपास करण्याची गरज व्यक्त केली. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने आर्थिक मदत केली आहे. पण या मदतीने दु:ख कमी होत नाही. त्यामुळे या हत्याप्रकरणाच्या खोलात जाऊन सूत्रधारांना तातडीने धडा शिकवला पाहिजे, असे शरद पवार यांनी सांगितले. मी इकडे आलो याचं कारण महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात घडलेली गोष्ट ही राज्याला न शोभणारी आहे. देशमुख कुटुंबीयांना न्याय दिला पाहिजे. ते दु:खी आहेत. आपण त्यांच्यासोबत आहोत. पण येथील स्थिती कशी दुरुस्त होईल, याची काळजी आपण घेतली पाहिजे, असे शरद पवार यांनी म्हटले.
बजरंग सोनावणे, निलेश लंके आणि जितेंद्र आव्हाडांचं पवारांकडून कौतुक
यावेळी शरद पवार यांनी बजरंग सोनावणे, निलेश लंके आणि जितेंद्र आव्हाड या तीन नेत्यांचे संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मुद्दा लावून धरल्याबद्दल कौतुक केले. लोकसभेचे अधिवेशन काल संपले. दोन-चार दिवस मी बघितले की, तुमचे प्रतिनिधी बजरंग सोनावणे आणि निलेश लंके यांनी हा प्रश्न उचलून धरला. ते गृहमंत्र्यांना भेटले आणि देशमुख यांना न्याय देण्याची मागणी केली. बजरंग सोनावणे यांचे भाषण ऐकल्यानंतर संपूर्ण सभागृह शांत झाले. प्रत्येकजण महाराष्ट्रात काय घडतंय, हाच प्रश्न विचारत होता. बजरंग बाप्पांनी म्हटल्याप्रमाणे या प्रकरणात जो काही सुसंवाद झालाय, त्याच्या खोलात गेले पाहिजे, मग तो मोबाईलवरील सुसंवाद असो, किंवा अन्य काही असो, याची माहिती काढली पाहिजे, खोलात गेले पाहिजे. तेव्हा वस्तुस्थिती सगळ्यांसमोर येईल. निलेश लंके आणि बजरंग सोनावणे यांनी संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी संसदेत आग्रह धरला. विधानसभेत संदीप क्षीरसागर आणि जितेंद्र आव्हाड यांनी हे प्रकरण मांडले. आव्हाड यांची आपण कोणत्या जातीचे आणि समाजाचे नाही, हे पाहिले नाही. त्यांनी ज्यांच्यावर अन्याय झाला, त्यांचे दु:ख मांडले, असे शरद पवार यांनी सांगितले.
आणखी वाचा