कोयना धरणाच्या भिंतीवर अडकला 8 फुटांचा अजगर; सर्पमित्रांच्या मदतीने सुखरुप जंगलात सोडलं
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्राचा संपूर्ण परिसर हा सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील एक भाग आणि दाटलेल्या जंगलाचा भाग म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी वाघ बिबट्या यांसारख्या हिंसक प्राण्यांबरोबर अनेक सर्प आणि पक्षीही आहेत.
सातारा : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या भिंतीवर एक भला मोठा अजगर अडकला होता. हा धक्कादायक प्रकार कोयना धरणाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना दिसला. कर्मचारी नेहमीप्रमाणे पाण्याची पातळी पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी पातळी पाहण्यासाठी लावलेल्या शेजारच्या मोठ्या अँगलवर त्यांना भलामोठा अजगर दिसला. त्यांनी तत्काळ यासंदर्भात वरिष्ठांना माहिती दिली. त्यांनतर वरिष्ठांनी वनविभागाला याबाबत माहिती दिली.
अजगर धरणात उतरण्यासाठी असलेल्या शिडीवर विळखा देऊन बसला होता. तिथं पोहोचणं अवघड होतं. तसेच अजगरालाही इतरत्र कुठेही जाता येत नसल्याचे पाहिल्यानंतर त्या अजगराला सुखरूप बाहेर काढण्यासाठी सर्पमित्रांना पाचारण करण्यात आलं. सर्पमित्रांनी अडकलेल्या महाकाय अजगराला सुरक्षितरित्या बाहेर काढलं. अजगराने अँगलला विळखा घातला होता, आणि त्याचं वजनही जास्त होतं. त्यामुळे त्याला बाहेर काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अजगराला चिमट्याच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आलं. अखेर दोन तासांच्या रेस्क्यु ऑपरेशनंतर सुरक्षित या अजगराला बाहेर काढण्यात यश आलं. त्यानंतर त्याला एका कापडी पिशवीत ठेवून वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सोपावण्यात आलं. या अजगराला कोयना धरणालगत असलेल्या जंगलात सोडण्यात आलं आहे. हा सगळा थरार पाहताना उपस्थित कर्मचाऱ्यांच्या अंगावर शहारे आले. हा आजगर तब्बल आठ फुटांचा असून तो तिथे कसा काय आला, हे मात्र समजू शकले नाही.
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्राचा संपूर्ण परिसर हा सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील एक भाग आणि दाटलेल्या जंगलाचा भाग म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी वाघ बिबट्या यांसारख्या हिंसक प्राण्यांबरोबर अनेक सर्प आणि पक्षीही आहेत. या अजगराला सुरक्षित बाहेर काढल्यानंतर सर्पमात्रांचे सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केलं.