एक्स्प्लोर
मराठवाड्यात जिल्हा परिषदेच्या पहिल्या टप्प्यासाठी जय्यत तयारी

औरंगाबाद : मराठवाड्यातल्या आठही जिल्हा परिषदांसाठी गुरुवारी मतदान होत आहे. त्या मतदानाची प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. या वेळी पहिल्यांदाच महिला कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात निवडणुकीची ड्युटी देण्यात आली आहे. सकाळपासून आठही जिल्ह्यातल्या मुख्यालयात निवडणुकांची ड्युटी लावण्यात आलेले कर्मचारी जमा झाले होते. मतदानाच्या पेच्या घेऊन कर्मचारी आपापल्या नियुक्तीच्या ठिकाणी रवाना झाले आहेत. कर्मचाऱ्यांना पोहचवण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या वेळच्या निवडणुकांचं वैशिष्ट्य म्हणजे, अनेक वर्षे कार्यकर्ता म्हणून काम केल्यानंतर उमेदवारी देण्याची वेळ आली तेव्हा नेत्यांनी आपल्या कुटुंबात उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी बंडखोरी झाली.
मराठवाड्यातली घराणेशाही :
जालना : जालन्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी मुलगी आशा पांडे-दानवेला तिकीट दिलंय. पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचा मुलगा राहुल लोणीकर निवडणुकीच्या रिंगणात आहे. शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे चुलत भाऊ उमेदवार आहेत. राष्ट्रवादीचे माजी मंत्री राजेश टोपे यांचे चुलत भाऊ सतीश टोपे यांना शहागड गटातून उमेदवारी देण्यात आली आहे. लातूर : अमित देशमुखांनी भाऊ धिरजला उमेदवारी दिलीये. लातुरात मंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लढणारी काँग्रेस अशी पाटील- देशमुखांची लढाई आहे. उस्मानाबाद : उस्मानाबादमध्ये आमदार राणा जगजितसिंहांच्या पत्नी अर्चना पाटील तेर मधून उमेदवार आहेत. आमदार बसवराज पाटलांचा मुलगा शरणला उमेदवार दिली आहे. खासदार रवी गायकवाडांनी मुलगा किरणला निवडणुकीच्या रिंगणात उभं केलं आहे. तर आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या मुलालाही उमेदवारी देण्यात आली आहे. नांदेड : नांदेडात भाजप नेते भास्करराव खतगावकरांनी सुनेला उमेदवारी दिली. इथे नेहमीप्रमाणे अशोक चव्हाणांना पराभूत करण्यासाठी विरोधकांनी प्रयत्न सुरु केलेत. बीड : बीडमध्ये राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली जिल्हा परिषद भाजपकडे घेण्याचं मोठं आव्हान ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या समोर आहे. इथे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आणि मुंडे भगिणी अशीच लढाई रंगणार आहे. बीडमधून क्षीरसागर कुटुंबियातून रेखाताई रवींद्र क्षिरसागर आणि संदीप रवींद्र क्षीरसागर यांना उमेदवारी मिळाली आहे. राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री सुरेश धस यांच्या पत्नीही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. परभणी : परभणीतून काँग्रेस अध्यक्ष आणि माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांनी आपले चिरंजीव समशेर वरपूडकर यांना उमेदवारी दिली. शिवसेनेचे माजी खासदार आणि सध्या काँग्रेसमध्ये असलेले तुकाराम रेंगे यांनी मुलगा बाळासाहेब रेंगेला निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलं आहे. माजी मंत्री रावसाहेब जामकर यांचे नातू आणि बाळासाहेब जामकर यांचा मुलगा संग्राम जामकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.आणखी वाचा























