एकनाथ शिंदे समर्थक आणि उद्धव ठाकरे समर्थक भिडले, डोंबिवलीत फोटोवरून वाद
Dombivli : शाखेतील फोटोवरून डोंबिवलीत एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला.

मुंबई : डोंबिवलीत शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट आज समोरासमोर भिडले. शाखेतील फोटोवरून सुरू झालेला वाद विकोपाला गेला आणि दोन्ही गटात चांगलचा राडा झाला. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला.
डोंबिवलीत शिंदे गटाची आज सभासद नोंदणी होती. यावेळी डोंबिवली शिवसेना शहर शाखेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे काढलेले फोटो पुन्हा लावण्यासाठी शिंदे समर्थक शहर शाखेत गेले. यावेळी ठाकरे गट आणि शिंदे गटात वाद झाला. या वादाचे रूपांतर काही वेळात राड्यात झाले. जवळपास शेकडो शिंदे समर्थकांनी शिवसेना शहर शाखेत एकच गोंधळ घातला. दोन्ही गटाकडून सुरू झालेली घोषणाबाजी व शिव्यांची लाखोली त्यामुळे शहर शाखेसह परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
या राड्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. या राड्या नंतर डोंबिवलीत शिवसेना मध्यवर्ती शाखेला छावणीचं स्वरूप आलं होतं. दरम्यान दोन्ही गटाकडून या शाखेचा ताबा घेण्यासाठी प्रयत्न सुरु असून त्यातूनच हा वाद झाल्याचं चर्चा रंगली आहे .
शिवसेना कोणाची यावरुन सध्या वाद सुरू आहे. ठाणे जिल्ह्यात देखील यावरून दोन्ही गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ठाणे जिल्ह्यात शिंदे यांचे वर्चस्व असल्याने ठाकरे समर्थकांकडून शिवसेना पक्षाची ताकद येथे वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वाढदिवसाच्या दिवशी पक्षातील कार्यकर्त्यांना भावनिक साद घालत प्रतिज्ञापत्र लिहून देण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर शिंदे गटानेही कार्यकर्त्यांकडून शपथपत्र लिहून घेण्यास सुरुवात केली आहे.
या सर्व घडामोडींचे डोंबिवलीत तीव्र पडसाद उमटत आहेत. काही दिवसांपूर्वी डोंबिवली शहर शाखेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटो उतरवण्यात आले होते. त्यामुळे समर्थकांमध्ये धुसफूस सुरू होती. आज दुपारच्या सुमारास काही शिंदे समर्थक डोंबिवली शहर शाखेत आले. त्यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचा फोटो पुन्हा शाखेत लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी उद्धव ठाकरे समर्थक व शिंदे समर्थक या दोन गटांमध्ये वादावादी झाली.
काही क्षणातच शेकडो शिंदे समर्थक डोंबिवली शहर शाखेत जमा झाले. दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच डोंबिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची समजूत काढली. तब्बल तीन तास हा राडा सुरू होता. अखेर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत केले.























