देवेंद्र फडणवीसांनी घेतली अण्णा हजारेंची भेट, अण्णा 30 तारखेच्या आंदोलनावर ठाम
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राळेगणसिद्धीत येऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली.चर्चा झाली, मात्र 30 जानेवारीच्या आंदोलनावर ठाम आहे, असं अण्णा हजारे म्हणाले.
अहमदनगर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राळेगणसिद्धीत येऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत माजी मंत्री राधाकृष्ण विखे, गिरीश महाजन हे देखील भेटले. फडणवीस आणि अण्णा हजारे यांच्यात सुमारे दीड तास चर्चा झाली. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा 50 टक्के जास्त हमीभाव द्यावा तसेच स्वामीनाथन आयोगाला स्वायत्तता द्यावी अशी मागणी अण्णांनी केली होती. मात्र अण्णांची मागणी मान्य न झाल्याने अण्णांनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे.
30 जानेवारी रोजी आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर केंद्र सरकारमध्ये हालचालींना वेग आला असून आज फडणवीस यांनी अण्णांची भेट घेतली. दरम्यान अण्णांचे विषय मार्गी लागावे अशी आमची इच्छा असून अण्णांचे मत आणि मागण्या केंद्र सरकारपुढे मांडणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आत्महत्या केलेल्या तमाम शेतकऱ्यांना सामूहिक श्रद्धांजली, औंढा ते चिलगव्हाण शेतकरी सहवेदना पदयात्रा
यावेळी केंद्रीय कृषिमंत्री यांनी दिलेले पत्र देवेंद्र फडणवीस यांनी अण्णांना दिले. मात्र तरीही आंदोलनावर ठाम असल्याचे अण्णांनी सांगितले आहे. भेटीनंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अण्णांचे मत आणि मागण्या जाणून घेतल्या असून त्या केंद्र सरकारपुढे मांडणार आहोत. अण्णा हजारे हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व आहे. अण्णांचे विषय मार्गी लागावे ही आमची पण इच्छा आहे. अण्णांच्या पत्राचे उत्तर चर्चा करून घ्यावे लागते म्हणून उत्तर दिले नाही. केंद्रीय कृषिमंत्री यांनी स्वतः सांगितलं आहे अण्णांना उत्तर द्यायचे आहे, असं फडणवीस म्हणाले.
दरम्यान, केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिलेले पत्र घेऊन देवेंद्र फडणवीस आले होते. चर्चा झाली, मात्र 30 जानेवारीच्या आंदोलनावर ठाम आहे, असं अण्णा हजारे म्हणाले.