(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दिल्लीतील हिंसाचारामध्ये इसिसचा हात? काश्मीरमधील दाम्पत्याला अटक
दिल्लीतील हिंसाचारप्रकरणीत दिल्ली पोलिसांनी एका दाम्पत्याला अटक केली आहे. प्राथमिक तपासात उघड झालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा इसिसशी संबंध आहे का? याबाबत पोलीस तपास करत आहेत.
नवी दिल्ली : दिल्लीत झालेल्या हिंसाचारात इसिसचा हात होता का? असा संशय आता व्यक्त केला जात आहे. या हिंसाचाराच्या माध्यमातून देशातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न इसिसचा असू शकतो. दिल्ली पोलिसांनी काश्मीरच्या दाम्पत्याला अटक केल्यानंतर हे प्रश्न उपस्थित होत आहेत. या दाम्पत्याचे इसिससोबत संबंध असल्याचंही समोर येत आहे. त्यांच्याकडे सापडलेल्या पुस्तकांमध्ये भारतातील विविध जाती-धर्मियांमध्ये वाद मतभेत निर्माण करायचे, अशा आशयाचे मजकूर लिहिण्यात आले आहेत. देशात आत्मघातकी हल्ला करण्याचाही त्यांचा कट होता, अशी माहिती समोर येत आहे.
इसिसची मोडस ऑपरेंडी अशीच असते, ज्यामध्ये देशातील अंतर्गत शांतता भंग करायची. याबाबत सध्या दिल्ली पोलीस तपास करत आहेत, अशी माहिती डीसीपी प्रमोद सिंह कुशवाहा यांनी दिली. दिल्ली पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. जहाँजेब सामी आणि हिना बशीर अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत. दोघांना दिल्लीच्या ओखला विहार परिसरातून अटक करण्यात आली असून दोघांची 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
डीसीपी कुशावाहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींचं इसिसच्या खोरासान प्रोविंसशी कनेक्शन आहे. सीएए आणि एनआरसी विरोधातील अनेक साहित्य त्यांच्याकडे आढळलं आहे. सीएए आणि एनआरसीविरोधात लोकांना भडकवण्याचं काम यांच्याकडून सुरु असल्याचा पोलिसांना संशय आहे. यांच्याकडून पोलिसांनी लॅपटॉप, चार मोबाईल, अनेक पुस्तकं जप्त केली आहे. या दोघांसोबत आणखी किती लोक सहभागी आहेत, याचा तपास पोलीस घेत आहेत.
जहांजेब आणि त्याची पत्नी हिना दोघेही उच्चशिक्षित आहेत. जहाजेब सॉफ्टवेअर इंजिनीअर आहेत. तर हिनाने बीसीएचं शिक्षण घेतलंय. दोघांनी एमबीए देखील केलं आहे. दोघे ऑगस्ट महिन्यात दिल्लीला राहायला आले आहेत. काश्मीरमधील इंटरनेट सेवा ठप्प झाल्यानंतर कंपनीचं काम होतं नसल्याने आपण दिल्लीत आल्याचं दोघे सांगत आहेत. सोशल मीडियावर दोघांचा लिखाण प्रक्षोभक आहे. सोशल मीडियावर दोघांनी अनेक ग्रुप तयार केले आहेत. ज्या माध्यमातून आपलं प्रक्षोभक लिखाण लोकांपर्यंत पोहोचवतात. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
संबंधित बातम्या :
Delhi Violence : हिंसाचाराच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना, 48 एफआयआर दाखल
Majha Vishesh | दिल्ली पेटवण्याचं पाप कुणाचं?
Delhi Riots | हिंसाचारग्रस्त भागात शूट अॅट साईटचे आदेश, डोवाल यांच्याकडून परिस्थितीचा आढावा