MHADA: म्हाडाच्या परीक्षेत डमी उमेदवार, अमरावतीतील तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल
MHADA: अमरावतीमध्ये डमी विद्यार्थी म्हणून परीक्षेला बसणाऱ्या तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई: म्हाडा मधील विविध पदांसाठी आज, मंगळवारी अमरावती शहरातील काही केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बडनेरा मार्गावरील सिपना महाविद्यालयातील केंद्रावर परिक्षार्थ्याऐवजी पेपर सोडविणार्या एका तरुणीला पकडण्यात आले. तर नांदगाव पेठ मार्गावरील बिझीलॅड मधील परीक्षा केंद्रावर एका युवकास ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
म्हाडामधील कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक आणि साहाय्यक या पदासांठी आज सकाळी 9 ते सायंकाळी 6 या काळात सत्रांमध्ये परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी शहरातील काही महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यात आले होते. या परीक्षेला अमरावतीसह अन्य जिल्ह्यातूनही विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. बडनेरा मार्गावरील सिपना महाविद्यालयातील केंद्रावरही संबंधित कन्सलटन्सी सर्व्हिसच्या वतीने परीक्षा घेण्यात येत होती. त्याचवेळी या केंद्रावरील पर्यवेक्षक व परीक्षा नियंत्रण अधिकारी यांना परीक्षार्थ्याऐवजी दुसरीच तरुणी पेपर सोडवित असल्याची बाब निदर्शनास आली.
त्यामुळे संबंधित अधिकार्यांनी तरुणीला पकडून तिची चौकशी केली. यावेळी ती डमी उमेदवार असल्याची बाब समोर आली. त्यामुळे संबंधित अधिकार्यांनी बडनेरा पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी परीक्षा केंद्र गाठून डमी उमेदवार तरुणीला ठाण्यात आणले. या प्रकरणी संबंधित अधिकार्यांच्या तक्रारीवरून तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
दुसरीकडे सायंकाळी 4 ते 6 दरम्यान नांदगाव पेठ मार्गावरील बिझीलॅड मधील परिक्षा केंद्रावर पेपर सुरु होण्या आधीच 3.45 वाजता तेथील परीक्षा निरीक्षक व केंद्र निरीक्षकांनी एका युवकास मोबाईलसह पकडले. ही माहिती त्यांनी तत्काळ नांदगाव पेठ पोलिसांना कळविली. पोलिसांनी तत्काळ परीक्षा केंद्र गाठून युवकास ताब्यात घेऊन त्यास ताब्यात घेतले. या दरम्यान रात्री उशिरा गुन्हा नोदविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: