Dam Water Storage: राज्यातील धरणांमधील जलसाठा झपाट्यानं घसरतोय, उजनी 24 टक्क्यांवर, जायकवाडी किती? वाचा विभागनिहाय जलसाठा
पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात येणारी आवर्तने तसेच विसर्ग लक्षात घेता पावसाळ्याला आणखी अडीच महिने शिल्लक असल्याने पिके जगण्यासाठी शेतकऱ्यांना झगडावे लागणार आहे.

Maharashtra Dam water storage: चैत्र महिन्याला सुरुवात झाली असून राज्यातील तापमानात प्रचंड वाढ होत आहे. आता धरणातील पाणीसाठा कमी होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा येत्या काही दिवसात बसण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी याच सुमारास राज्यभरातील धरण साठा 38.35 टक्क्यांवर होता. यंदा लघु, मध्यम, आणि मोठ्या धरणांमधील पाणीसाठा 45.56 टक्क्यांवर आला आहे. मागील वर्षी पेक्षा परिस्थिती दिलासादायक वाटत असली तरी लाखो नागरिकांची तहान भागवणारी काही धरणांमधील पाणी पातळी आता झपाट्याने घसरू लागली आहे. (Maharashtra Dam Water)
जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील कोयना धरण 49 टक्क्यांवर गेले आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठे जायकवाडी धरण 52.18 टक्क्यांवर आहे. गेल्या वर्षी याच सुमारास शून्यावर गेलेलं उजनी धरण 24 टक्क्यांवर पोहोचलं आहे. एप्रिल मध्यापर्यंत उजनीचा साठा मायनसमध्ये जाण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. पुण्यातील भाटघर पानशेत धरण 42 टक्क्यांवर आहे.
कोणत्या विभागात किती पाणीसाठा शिल्लक?
राज्यातील लघु मध्यम व मोठ्या एकूण 2997 धरणांमध्ये सध्या 45.56 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाड्यात एकूण 920 एकूण धरणांमध्ये 44.98% जलसाठा आहे. तर नाशिक व नगर विभागात 47.16% पाणी शिल्लक असल्याचा सांगण्यात आलंय. पुणे विभागात 42.11% तर कोकण विभागात 52.55% पाणी शिल्लक आहे. नागपूर व अमरावती विभागात 44.42% व 52.59% अनुक्रमे पाणीसाठा आहे. उन्हाळी पिकांसह नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात येणारी आवर्तने तसेच विसर्ग लक्षात घेता पावसाळ्याला आणखी अडीच महिने शिल्लक असल्याने पिके जगण्यासाठी शेतकऱ्यांना झगडावे लागणार आहे.
कोणत्या धरणात काय स्थिती?
हिंगोलीतील सिध्देश्वर, येलदरीत 65 टक्के पाणी आहे. नांदेडच्या विष्णूपूरीचा साठा 42 टक्क्यांवर गेला आहे. धाराशिवच्या सिना कोळेगाव धरणात 22 टक्के पाणी शिल्लक आहे. परभणीच्या निम्न दुधनामध्ये गेल्या वर्षी 7 टक्के पाणीसाठा होता. आता तो 43.54 टक्क्यांवर गेलाय.नाशिकच्या दारणा धरणात 46 टक्के तर गंगापूर धरणात 63 टक्के पाणी शिल्लक आहे. गिरणा धरणात 32 टक्के पाणी असून कोल्हापूरच्या राधानगरीमध्ये 57 टक्के पाणी आहे.
कोयना धरणाच्या बॅक वॉटरमधील जलाशयात पाण्याची घट
सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात बामणोली, तापोळा परिसर हा जल पर्यटनावर अवलंबून असून सध्या या भागात कोयना बॅक वॉटर मधील शिवसागर जलाशयाची पाणी पातळी दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. मागील महिनाभरात कोयना धरणातून 17 टीएमसी पाण्याचा विसर्ग वीज निर्मिती आणि शेतीसाठी पायथागृहातून करण्यात आला आहे. यामध्येच 3 टीएमसी पाण्याचा विसर्ग कर्नाटकला करण्यात यावा अशी मागणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आले आहे.
हेही वाचा:
























