'कोरोनाच्या कामात लातूर जिल्ह्यात लाखोंचा भ्रष्टाचार', माजी पालकमंत्र्यांचा आजी पालकमंत्र्यांवर आरोप
राज्यातील कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागल्याने प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. पण अशातच काही ठिकाणी कोरोना कामात भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप-प्रत्यारोपही होत आहेत.
लातूर : कोरोनाच्या काळात पालकमंत्र्यांच्या आशीर्वादानं लातूर जिल्ह्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप लातूरचे माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सध्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्यावर केला आहे. हा गंभीर आरोप करत पालकमंत्र्यांच्या आशीर्वादानेच जिल्हा जुगाराचा मोठा अड्डा बनला असून अनेक अवैध धंदे जोमात सुरु असल्याचंही निलंगेकर यांनी म्हटलं आहे.
कोरोना महामारीच्या काळात लातूर जिल्ह्यात पीपीई किट असेल किंवा कोविड रुग्णांना देण्यात येणारा आहार असेल यामध्ये मोठा भ्रष्टाचार करण्यात आला असल्याचं माजी पालकमंत्री निलंगेकर म्हणाले आहेत. यावेळी एका रुग्णाला तपासण्यासाठी एक पीपीई किट दोन हजार रुपये किंमतीला खरेदी करण्यात आलं त्यातही मोठा घोळ करण्यात आला. तर रुग्णांना देण्यात आलेल्या आहाराचा खर्च आठ कोटी रुपये दाखवण्यात आला असून या सर्वाचा हिशोब जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वारंवार मागून देखील समोर आणला जात नसल्याचं निलंगेकर म्हणाले आहेत. तसंच जिल्हा प्रशासन उडवा उडवीची उत्तरे देत असून हा सगळा भ्रष्टाचार विद्यमान पालकमंत्री अमित देशमुख यांच्या आशिर्वादामुळेच झाल्याचा गंभीर आरोप निलंगेकरांनी केला आहे.
राज्यात कोरोनाचा आलेख वाढताच
राज्यात गुरुवारी तब्बल 46 हजार 406 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 34 हजार 658 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तसंच 36 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मागील दोन दिवसांपासून कोरोनाची संख्या ही कमी होताना दिसत आहे. याशिवाय ओमायक्रॉनच्या एकाही रुग्णांची नोंद झालेली नाही. आतापर्यंत 1367 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 775 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला! गुरूवारी 46 हजार 406 नवीन कोरोनाबाधितांची नोंद
- मुंबईतील रोजच्या कोरोना रुग्ण संख्या चढ-उताराचा निष्कर्ष नेमका काय काढायचा?
- Mumbai Corona Update : दिलासा! मुंबईत गुरुवारी नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांचे प्रमाण जास्त
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha