'तुमचा रुग्ण तडफडेल, तरी एकही अॅम्ब्युलन्स मिळणार नाही, तशी मी व्यवस्था केलीय'; सिंधुदुर्गात अॅम्ब्युलन्स मालकाची अरेरावी
अॅम्ब्युलन्समध्ये रुग्णाला दुसरीकडे हलवण्यासाठी सोयी नसल्यामुळे अॅम्ब्युलन्स परत पाठवल्यानंतर अॅम्ब्युलन्स मालकाला संताप अनावर झाला. त्यानं फोन करून पैशाची मागणी केली आणि अरेरावीची भाषा केली.
सिंधुदुर्ग : कोविड रुग्णांना अॅम्ब्युलन्समधून ने-आण करण्यासाठी अॅम्ब्युलन्स मालकांकडून अवाजवी भाडं आकारल जातं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील अमोल बांदिवडेकर हा गेल्या दोन माहिन्यांपासून देवगड मधील मीठबाव येथील त्याच्या मामाकडे राहत होता. त्याला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे त्याला देवगड तहसिल कार्यालयाच्या शेजारी असणाऱ्या कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे डॉक्टरांनी देवगड येथून उपचारासाठी अन्य ठिकाणी हलविण्यास सांगितले. त्यामुळे त्याच्या काकीने त्याला मुंबईत उपचारासाठी नेण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यासाठी ओरोस येथील अॅम्ब्युलन्स मालक विशाल जाधव यांच्याकडे फोनवरून अॅम्ब्युलन्सची चौकशी केली. त्यांनी देवगड ते मुंबई हे भाडे 30,000 रुपये सांगितले. त्यानंतर त्याच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता, त्याने फोन उचलला नाही. त्यानंतर रात्री 8 वाजता अॅम्ब्युलन्स देवगड रुग्णालयात पाठवली, मात्र अॅम्ब्युलन्समध्ये आॕक्सिजन सिलेंडरचे एकच नळकांडे असून त्यात किती ऑक्सिजन आहे, याची अॕम्ब्युलन्स मालकाला आणि वाहन चालकालासुद्धा कल्पना नव्हती. तसेच स्ट्रेचरची रुंदी फारच कमी होती आणि अॕडजेस्टेबलही नव्हती. रुग्णास रात्रभर त्रास झाला असता. त्यामुळे या अॅम्ब्युलन्सनं प्रवास करणे धोक्याचे असल्यामुळे सदर अॅम्ब्युलन्सच्या मालकाला फोन करुन त्यांनी अॅम्ब्युलन्स परत पाठविली.
अॅम्ब्युलन्स परत पाठवल्यानंतर मालकांनं फोन करून पैशाची मागणी केली आणि अरेरावीची भाषा केली. तसेच सिंधुदुर्गामध्ये एकही अॅम्ब्युलन्स देवगड येथून मुंबईला येणार नाही, अशी मी व्यवस्था केली आहे आणि तुमच्या रुग्णाचा तडफडून मृत्यू होईल अशा शब्दात अॅम्ब्युलन्सचे मालक विशाल जाधव यांनी प्रणाली बांदिवडेकर यांच्याशी अर्वाच्य भाषेत बोलत अवाच्या सव्वा भाडं सांगत, पैसे ताबडतोब देण्याची मागणी केली.
महिलेशी फोनवरून अर्वाच्य भाषेत बोलून अवाच्या सव्वा भाडं सांगणं. तसेच अॅम्ब्युलन्समध्ये रुग्णासाठी उपयुक्त सोय न ठेवणं. आकारलेलं भाडं हे दोन ते तीन पट असल्यानं मनसेनं जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि आरटीओ यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे. तसेच त्या ऍम्ब्युलन्स मालकाची दादागिरी सुरु आहे. त्याच्यावर योग्य प्रकारे कारवाई झाली नाही तर मनसे आंदोलन करेल, असा इशाराही दिला आहे.
जिल्ह्यात सुरु असलेल्या या सर्व प्रकारावर नियंत्रण राहिलेलं नाही. सिव्हिल सर्जन, सत्ताधारी आमदार, पालकमंत्री यांनी या सर्व यंत्रणेवर नजर ठेवली पाहिजे. कोरोनासारख्या संकटाच्या काळात कोणी लुबाडत असेल तर तशी हिम्मत कुणाचीही होता नये. जो अॅम्ब्युलन्स चालक ज्या पद्धतीने भाडं मागतोय आणि ज्या पद्धतीने बोलतो असं या अगोदर सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालं नव्हतं. या उद्धव ठाकरे यांच्या सरकारमुळे सगळे वाईट दिवस आलेले आहेत. पणवती सरकार म्हणून या सरकारला बोलण्याची वेळ आलेली आहे. अश्या पद्धतीच्या घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात थांबल्या नाहीत तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं भाजप आमदार नितेश राणे यांनी बोलताना सांगितलं.
दरम्यान, सदर प्रकरणी रुग्णाच्या नातेवाईक प्रणाली बांदिवडेकर यांच्या तक्रारीनंतर पोलीस प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र संपूर्ण चौकशी केल्यानंतर प्रतिकिया मिळणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- लखपती भिकारी! हरवलेले पावणेदोन लाख रुपये पोलिसांनी अवघ्या तीन तासात शोधले
- तीन अपत्यांमुळे सोलापुरातील शिवसेना नगरसेविकेचे पद रद्द, मुंबई उच्च न्यायलयाचा निकाल