(Source: Poll of Polls)
लखपती भिकारी! हरवलेले पावणेदोन लाख रुपये पोलिसांनी अवघ्या तीन तासात शोधले
बीड जिल्ह्यातील परळी येथे एका भिकाऱ्याचे तब्बल पावणेदोन लाख रुपये हरवले होते. पोलिसांनी ते अवघ्या तीन तासांत मिळवून दिले आहेत
बीड : पोलिसांनी ठरवलं तर कोणत्याही गुन्ह्याची उकल क्षणात होऊ शकते असं म्हटलं जातं याचाच प्रत्यय बीडच्या परळी जिल्ह्यामध्ये आला. एका भिकाऱ्याने पै पै करून जमलेले पावणेदोन लाख रुपये हरवल्याचे पोलिसांना सांगितले आणि चार पोलिसांनी एकत्रित येऊन अवघ्या तीन तासात त्यांना ते मिळवून दिले.
परळी येथील वैद्यांनाथ मंदिराच्या परिसरात अनेक बेवारस अनाथ लोक भीक मागून आपला उदरनिर्वाह करतात. बाबुराव नाईकवाडे हे 80 वर्षांचे गृहस्थ आहेत. वैजनाथ मंदिराच्या पाठीमागे बाबूरावांचे कुटुंब राहते. मात्र, मागच्या कित्येक वर्षांपासून ते आपल्या घरी गेलेच नाहीत. या मंदिरासमोर बसायचे आणि आलेल्या माणसांकडून कधीही एक रुपये, दोन रुपये, पाच रुपये, दहा रपये असे गोळा करायचे, त्यावर त्यांची गुजराण चालायची.
बाबुराव यांनी एक एक रुपया जोडून आपल्याकडे तब्बल पावणेदोन लाख रुपयांची पुंजी जमवली होती, हे सगळे पैसे ते आपल्या पिशवीत ठेवायचे. त्यामुळे जिथे बाबुराव तिथे त्यांचं हे गाठोडं. अगदी झोपेत सुद्धा बाबू राव आपलं गाठोडे कधीच सोडत नसायचे. मात्र, आज पैशाची पिशवी हरवली आणि त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं.
पोलीस स्टेशनला रडत-रडत आलेल्या बाबुरावांचे अश्रू बघून पोलिसांनाही कळून चुकले की नक्की काहीतरी घडलंय. बाबुराव मात्र माझे पैसे चोरीला गेलेत असं सांगत होते. अखेर पोलिसांनी एक टीम तयार केली चार पोलीस या पैशाच्या शोधामध्ये निघाले. बाबूराव जिथे जिथे जायचे तिथे पोलीस शोध घ्यायचे आणि अखेर पोलिसांच्या हाती ती पैशाची पिशवी लागली.
कसा घेतला पिशवीचा शोध?
बाबूरावांची तक्रार केल्यानंतर पोलिस शोध मोहिमेवर निघाले. खरतर बाबुरावांनी आपली पिशवी चोरीला गेल्याचा आरोप केला होता मात्र पोलिसांनी ते कुठेतरी विसरले असतील असा कयास पोलिसांनी बांधला आणि तपास सुरू केला. बाबुरावांना घेऊन ज्या ज्या ठिकाणी जायचे त्या सगळ्या घटनांचा तपास पोलिसांनी करायला सुरुवात केली. आदिनाथ मंदिराच्या बाजूला एका खड्ड्यामध्ये बाबूरावांची पिशवी पडली असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आणि ती पिशवी घेऊन पोलीस बाबुराव सहित पोलीस स्टेशनला पोहोचले
ज्या वेळेस पोलिसांनी ही पिशवी उघडली त्यावेळेस तर गंमतच झाली. बाबूरावानी सांगितले होते माझ्या पिशवीमध्ये एक लाख 40 हजार रुपये होते. मात्र, प्रत्यक्ष मोजणी करायला सुरुवात झाली त्यावेळेस एक लाख 72 हजार 290 रुपये सापडले. पोलिसांनी हे सर्व पैसे या आजोबांच्या हवाली केले आहेत.